Mahabreaking

[breaking_news]

Madhav Dhandale: सामाजिक समरसता आणि धर्मांतरणविरोध ही विहिंपची उपलब्धी : माधव धंदाळे

Madhav Dhandale: साखरखेर्डा येथे विश्व हिंदू परिषद स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री माधव धंदाळे यांनी सामाजिक समरसता, जातीय भेदभाव निर्मूलन आणि धर्मांतरणाच्या प्रश्नावर विचार व्यक्त केले.

Madhav Dhandale

जातीय भेदभावाची दरी मिटविण्यासाठी विहिंपचे प्रयत्न; साखरखेर्ड्यात स्थापना दिन उत्साहात

साखरखेर्डा : साखरखेर्डा येथे विश्व हिंदू परिषद स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री माधव धंदाळे यांनी सामाजिक समरसता, जातीय भेदभाव निर्मूलन आणि धर्मांतरणाच्या प्रश्नावर विचार व्यक्त केले.

“जोपर्यंत हिंदू समाज जातीय सीमा, अस्पृश्यता आणि उच्च-नीच भेदभावात विभागलेला राहील, तोपर्यंत समाज सशक्त होऊ शकत नाही आणि राष्ट्रही सुरक्षित राहू शकत नाही. समाजातील विषमतेमुळे धर्मांतरणाच्या घटना घडतात. विश्व हिंदू परिषदेने सामाजिक समरसतेचा वैचारिक सिद्धांत प्रत्यक्ष कृतीत उतरवून एक व्यापक आंदोलन उभे केले. त्यामुळे धर्मांतरणाच्या घटनांवरही नियंत्रण मिळविण्यास मदत झाली,” असे माधव धंदाळे यांनी सांगितले.

सामाजिक समरसतेसाठी विश्व हिंदू परिषदेने घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना धंदाळे म्हणाले की, ‘प्रत्येक हिंदू सहोदर आहे’ हा संदेश संतांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचविण्यात आला. जन्माच्या आधारावर कोणीही मोठा किंवा लहान नसल्याचा विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘न हिंदू पतितो भवेत्’ म्हणजेच कोणताही हिंदू पतित अथवा अस्पृश्य नाही, हा संदेशही संतांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.

याच संदर्भात ९ नोव्हेंबर १९८९ रोजी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिलान्यासाची पहिली वीट दलित बांधव रामेश्वर चौपाल यांच्या हस्ते ठेवण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला.

विश्व हिंदू परिषदेने पूज्य संत, शंकराचार्य आणि धर्माचार्यांना सोबत घेऊन दलित व वंचित वस्त्यांमध्ये पदयात्रा काढल्या. संतांनी वंचित बांधवांसोबत एकत्र बसून भोजन (सहभोज) केले. अशा उपक्रमांमुळे समाजातील दीर्घकाळाची दरी कमी करण्यास मदत झाल्याचे धंदाळे यांनी सांगितले.

धर्मांतराच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी धर्मांतरित होणाऱ्या हिंदू बांधवांनी संत रविदास यांचे जीवनचरित्र वाचावे, असे आवाहन केले. “धर्मनिष्ठा काय असते आणि देवभक्तीसोबत राष्ट्रभक्ती कशी जोपासावी, याचे मूर्तिमंत उदाहरण संत रविदास यांच्या जीवनचरित्रातून मिळते,” असेही त्यांनी शेवटी सांगितले.

या कार्यक्रमाला साखरखेर्डा येथील प्रसिद्ध व्यावसायिक दिलीप लखोटीया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषद जिल्हा कोषाध्यक्ष आत्माराम निकम होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top