Mahabreaking

[breaking_news]

  Shri Sant Gajanan Maharaj: श्री संत गजानन महाराजांचा ११६ वा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

Shri Sant Gajanan Maharaj: श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव  यांच्या वतीने श्री गजानन महाराजांचा ११६ वा पुण्यतिथी उत्सव दि. १२ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. उत्सवाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात मोठ्या संख्येने वारकरी, भाविक व भक्त सहभागी झाले.

  Shri Sant

  ३९७ दिंड्यांचा सहभाग; १ लाख १० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वितरण

शेगाव : श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव  यांच्या वतीने श्री गजानन महाराजांचा ११६ वा पुण्यतिथी उत्सव दि. १२ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत धार्मिक प्रथा-परंपरेनुसार भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. उत्सवाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात मोठ्या संख्येने वारकरी, भाविक व भक्त सहभागी झाले.

उत्सवाच्या चारही दिवसांत दररोज सकाळी ६ ते ६.४५ वाजता काकडा, सकाळी ७.३० ते ९ वाजता गाथा भजन, दुपारी ४ ते ५ वाजता प्रवचन, सायंकाळी ५.३० ते ६ वाजता हरिपाठ तसेच रात्री ८ ते १० वाजेपर्यंत श्रीहरी कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

या सप्ताहात श्री ह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते (शिरसोली), श्री ह.भ.प. सुरेश बुवा बाकडे (पोफाळी), श्री ह.भ.प. भरत बुवा चौधरी (म्हैसवाडी), श्री ह.भ.प. अच्युत बुवा दस्तापूरकर (परभणी) आणि श्री ह.भ.प. निवृत्ती बुवा तराळे (व्याळा) आदी कीर्तनकारांची श्रीहरी कीर्तने झाली.

गणेशयाग व वरुणयागाची पूर्णाहुती

श्री गणेशयाग व वरुणयागास भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून प्रारंभ झाला. त्याची भाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी सकाळी १० वाजता पूर्णाहुती करण्यात आली. तसेच श्रींच्या समाधी सोहळ्यानिमित्त श्रीहरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाला विशेष भक्तिमय वातावरण प्राप्त झाले.

३९७ दिंड्यांचा उत्सवात सहभाग

यंदाच्या श्री पुण्यतिथी उत्सवात श्रींच्या सेवेत तब्बल ३९७ दिंड्यांनी सहभाग घेतला. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या ८० नवीन दिंड्यांना संस्थानच्या वतीने १० टाळ, १ वीणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत आदी संतवाङ्मय तसेच श्री माऊली पताका वितरित करण्यात आल्या.

जुन्या दिंड्यांना भजनी साहित्याच्या दुरुस्तीसाठी नियमांनुसार सानुग्रह अंशदान, तसेच इतर व्यवस्थेसाठी आवश्यक सहकार्य करण्यात आले. उत्सवानिमित्त शेगाव येथे दाखल झालेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी भोजनप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विसावा संकुल येथे प्रथमोपचार केंद्राची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

विविध शाखांवरही समाधी उत्सव

उत्सवाच्या कालावधीत श्री शेगाव संस्थानसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर आणि गिरडा या सर्व शाखांवरही श्रींचा समाधी उत्सव धार्मिक वातावरणात संपन्न झाला.

या सर्व ठिकाणी आलेल्या भाविक व वारकऱ्यांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. या उत्सवाच्या माध्यमातून १ लाख १० हजारांहून अधिक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

श्री गजानन महाराजांच्या कृपेने यंदाच्या पुण्यतिथी उत्सवादरम्यान वारकरी, भक्त आणि भाविकांची सेवा करण्याची संधी संस्थानला लाभली, असे श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने कळविण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top