Nitin Deshmukh :विदर्भात तब्बल ५१ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना महायुती सरकार मात्र सत्तेच्या मस्तीत मश्गूल असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी केला.

२९ सप्टेंबरला बुलढाण्यात शेतकरी आक्रोश मोर्चा; ‘शेतकरी होरपळतोय, पिके जळतायत’
बुलढाणा : विदर्भात तब्बल ५१ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक भागांत कोरड्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिके करपण्याच्या मार्गावर असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना महायुती सरकार मात्र सत्तेच्या मस्तीत मश्गूल असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि माजी केंद्रीय मंत्री, पक्षाचे नेते, प्रवक्ते तथा खासदार अरविंदजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा शहरातील ओंकार लॉन येथे शेतकरी आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार नितीन देशमुख यांनी राज्यातील महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. येत्या २९ सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरात मोठ्या संख्येने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
‘शेतकरी होरपळतोय, पिके जळतायत’
“शेतकरी होरपळतोय, पिके जळतायत; मात्र महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे कवडीचेही सोयरसुतक नाही,” अशा शब्दांत आमदार नितीन देशमुख यांनी सरकारवर हल्लाबोल केला.पावसाअभावी खरीप पिकांवर मोठे संकट आले असून, शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची तातडीने गरज आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, तसेच संभाव्य चाराटंचाई आणि पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी देशमुख यांनी केली.
सरकारला जागे करण्यासाठी आक्रोश मोर्चा
शेतकऱ्यांच्या संकटाकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारला आता शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकविल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा आमदार नितीन देशमुख यांनी दिला. शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे हे शिवसेनेचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.“कुंभकर्णी झोपेत गेलेल्या महायुती सरकारला जागे करण्यासाठी बुलढाण्यातील शेतकरी आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा,” असे आवाहन त्यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांना केले.
पदाधिकारी, शिवसैनिकांची मोठी उपस्थिती
बैठकीला मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके, प्रा. दत्तात्रय लहाने, युवासेना जिल्हाप्रमुख नंदू कर्हाडे, जिल्हासंघटक ॲड. सुमित सरदार यांच्यासह अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आगामी २९ सप्टेंबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व शिवसैनिकांनी गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा आणि त्यांच्या समस्या मोर्चाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

