protest ends: नागापूर गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी गांधी जयंतीदिनी पाण्याच्या टाकीवर चढून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख दीपक गायकवाड यांनी सुरू केलेले ‘शोले स्टाईल’ आंदोलन अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने दुपारी २ वाजता नागापूर येथे नवीन विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) उपलब्ध करून दिले. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वामी यांनी येत्या चार दिवसांत पाणीपुरवठ्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दीपक गायकवाड टाकीवरून खाली उतरले.

दीपक गायकवाडांच्या टाकीवरील आंदोलनाला यश; नागापूरला रोहित्र दाखल, चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन
डोणगाव : नागापूर गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी गांधी जयंतीदिनी पाण्याच्या टाकीवर चढून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विभागप्रमुख दीपक गायकवाड यांनी सुरू केलेले ‘शोले स्टाईल’ आंदोलन अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने दुपारी २ वाजता नागापूर येथे नवीन विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) उपलब्ध करून दिले. तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वामी यांनी येत्या चार दिवसांत पाणीपुरवठ्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दीपक गायकवाड टाकीवरून खाली उतरले.
नागापूर येथे जलजीवन मिशन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यातच रोहित्र उपलब्ध नसल्याने विद्युत जोडणी झालेली नव्हती. परिणामी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होत नसल्याने गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता.
या प्रश्नावर प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस तोडगा निघत नसल्याने संतप्त झालेले दीपक गायकवाड यांनी गांधी जयंतीदिनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. रोहित्र बसवून पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.
रोहित्र घटनास्थळी दाखल
आंदोलनाची माहिती मिळताच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कनिष्ठ अभियंता स्वामी यांनी दीपक गायकवाड आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. येत्या चार दिवसांत पाणीपुरवठा योजनेबाबत आवश्यक ती कार्यवाही करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, प्रशासनाकडून नवीन विद्युत रोहित्र प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल करण्यात आले. लेखी आश्वासन आणि रोहित्र उपलब्ध झाल्यानंतर दीपक गायकवाड यांनी आपले आंदोलन स्थगित केले आणि ते पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले.
या आंदोलनामुळे प्रशासनाला जाग आल्याची भावना नागापूर येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली. मात्र, कनिष्ठ अभियंता स्वामी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार चार दिवसांत पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दीपक गायकवाड यांनी दिला आहे.
पत्रकाराला पोलिसांकडून कथित धमकी; कारवाईची मागणी
दरम्यान, आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी नागापूर येथे गेलेले पत्रकार देविदास खनपटे यांच्याशी पोलिसांनी कथितरित्या अर्वाच्य भाषेत बोलून धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पत्रकार देविदास खनपटे हे आंदोलनाचे वृत्तांकन करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक विजय अजमिरे यांनी त्यांना ‘तुम्ही शांतता भंग करीत आहात,’ असे सांगत तेथे उपस्थित नागरिकांसमोर कथितरीत्या धमकावल्याचे खनपटे यांनी म्हटले आहे. आंदोलन हाताळताना निर्माण झालेला तणाव पत्रकारांवर काढणे योग्य आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या प्रकारानंतर ठाणेदार गणेश इंगोले यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे पत्रकार देविदास खनपटे यांनी सांगितले. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक विजय अजमिरे यांच्या कथित वर्तनाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खनपटे यांनी केली आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

