Health Centre : पडसो बडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली बाभुळगाव जहागीर येथील उपआरोग्य केंद्राचा कारभार चालतो. मात्र, उपआरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर होत असल्याच्या तक्रारी तसेच उपआरोग्य केंद्राला कुलूप लावून ठेवण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली.

‘आरोग्य केंद्राला कुलूप नको’; तक्रारीची दखल घेत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची कठोर कारवाईची तंबी
आगाखान पठाण
बाभुळगाव जहागीर : पडसो बडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली बाभुळगाव जहागीर येथील उपआरोग्य केंद्राचा कारभार चालतो. मात्र, उपआरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर होत असल्याच्या तक्रारी तसेच उपआरोग्य केंद्राला कुलूप लावून ठेवण्याचे प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून, संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली.
बाभुळगाव जहागीर ग्रामपंचायत प्रशासनाने कामचुकार व गैरहजर राहणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. शासनाची आरोग्य सेवा सर्वसामान्य व गरजू रुग्णांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी, तसेच आरोग्य सेविका व संबंधित कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, अशी मागणीही ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे केली होती.
या तक्रारीची तसेच प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी अकोला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संध्या शेगोकार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील सुपरवायझर मालोकार यांना चौकशीचे आदेश दिले.
त्यानुसार, दि. ३० सप्टेंबर रोजी अकोला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संध्या शेगोकार, सुपरवायझर मालोकार, पडसो बडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐश्वर्या रंगारी, बाभुळगाव जहागीरचे सरपंच सुशील शिरसाट आणि उपसरपंच शाहरुख खान पठाण यांच्या उपस्थितीत उपआरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. चौकशीच्या वेळी उपआरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
मुख्यालयी राहण्याचे निर्देश
चौकशीनंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संध्या शेगोकार यांनी आरोग्य सेविकेला मुख्यालयी राहण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच उपआरोग्य केंद्रात तसेच पडसो बडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवांची संपूर्ण माहिती दर्शनीय ठिकाणी फलकाद्वारे लावावी, जेणेकरून उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना सहज मिळू शकेल, असे निर्देश देण्यात आले.
उपआरोग्य केंद्र कुलूपबंद ठेवू नये तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून नियमितपणे आरोग्य सेवा द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले. दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी न केल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फीची तरतूद असल्याचे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नियमांचे पालन करण्याची ग्रामपंचायतीची सूचना
सरपंच सुशील शिरसाट आणि उपसरपंच शाहरुख खान पठाण यांनीही संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून नागरिकांना नियमित आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, असे सांगितले.
नियमांचे पालन न झाल्यास कामचुकार आरोग्य कर्मचाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फीचा प्रस्ताव ग्रामपंचायत प्रशासनामार्फत आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येईल, असे सरपंच व उपसरपंचांनी स्पष्ट केले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

