Shankarrao Shelke : अकोट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारुगण येथील बहुचर्चित कालंका माता मंदिर चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास करून आरोपीला जेरबंद करणाऱ्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके आणि त्यांच्या तपास पथकाचा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी मुंबई येथे सन्मान केला. पोलीस महासंचालकांच्या दालनात अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या उत्कृष्ट तपासकार्याचा गौरव करण्यात आला.

अकोट मंदिर चोरी प्रकरणातील यशस्वी तपासाची दखल; मुंबईत तपास पथकाचा सन्मान
संजय तायडे
अकोला : अकोट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारुगण येथील बहुचर्चित कालंका माता मंदिर चोरी प्रकरणाचा यशस्वी तपास करून आरोपीला जेरबंद करणाऱ्या अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके आणि त्यांच्या तपास पथकाचा महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी मुंबई येथे सन्मान केला. पोलीस महासंचालकांच्या दालनात अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या उत्कृष्ट तपासकार्याचा गौरव करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अकोट येथील कालंका माता मंदिरातून अज्ञात चोरट्याने देवीच्या मूर्तीवरील ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७५० ग्रॅम चांदी तसेच दानपेटीतील १५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेमुळे अकोट शहरासह परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषणातून आरोपीचा शोध
या संवेदनशील गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन प्रमुख शंकरराव शेळके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अमोल काशीराम तेलगोटे याच्यावर संशय निश्चित झाला. त्याचा शोध घेण्यासाठी एलसीबीचे पथक थेट रायपूर (छत्तीसगड) येथे रवाना झाले. आरोपी परतीच्या प्रवासात असताना अमरावतीजवळ सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
७.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त
चौकशीदरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरीतील सोन्याचे दागिने, सोन्याची लगड, चांदीचे बिस्कीट, चांदीचे कडे, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच इतर साहित्य असा एकूण ७ लाख २१ हजार ६८ रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
तपास पथकाचा राज्यस्तरीय गौरव
या गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील गुन्ह्याचा यशस्वी तपास केल्याबद्दल १७ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी तपास पथकाचा विशेष गौरव केला. मुंबई येथील त्यांच्या दालनात तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडखे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुलतान पठाण आणि वसीमोद्दीन यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या सन्मानाबद्दल पोलीस दलासह अकोला जिल्ह्यातील नागरिकांकडून तपास पथकाचे अभिनंदन करण्यात येत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

