Shankarrao Shelke : प्रामाणिक सेवा, धाडसी निर्णयक्षमता, तपासातील कौशल्य आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत दाखविलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर बोरगाव मंजूचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांची वाशिम येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे पोलीस दलासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सहकारी अधिकारी आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

गुन्हे उकल, कडक शिस्त आणि जनतेचा विश्वास; शंकरराव शेळके उपअधीक्षकपदी
संजय तायडे
बोरगाव मंजू : प्रामाणिक सेवा, धाडसी निर्णयक्षमता, तपासातील कौशल्य आणि कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत दाखविलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर बोरगाव मंजूचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांची वाशिम येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) म्हणून पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या पदोन्नतीमुळे पोलीस दलासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सहकारी अधिकारी आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत असताना शंकरराव शेळके यांनी एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि कठोर अधिकारी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रभावी वचक निर्माण झाला होता. विविध गंभीर गुन्ह्यांची उकल, आरोपींना अटक, तसेच सर्वसामान्यांना कायद्याच्या चौकटीत न्याय मिळवून देण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळे जनतेत त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली होती.
शेळके यांनी बोरगाव मंजू येथील कार्यकाळात केवळ गुन्हे उघडकीस आणण्यावर भर न देता, पोलीस-जनता संवाद अधिक मजबूत करण्याचे कामही केले. त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावाबाबत विविध चर्चा होत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांनी नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करत विश्वासाचे नाते निर्माण केले. त्यामुळे पोलीस ठाण्याबाबत जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला.
बोरगाव मंजूतील यशस्वी कारकीर्दीनंतर त्यांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि अकोला स्थानिक गुन्हे शाखा येथेही उल्लेखनीय कामगिरी बजावली. विविध गुन्ह्यांच्या तपासातील नियोजनबद्ध पद्धत, तपासातील अचूकता आणि कठोर अंमलबजावणी याची दखल घेत त्यांना २०२४ चे केंद्रीय दक्षता पदक प्रदान करण्यात आले. हे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे यश मानले जाते.
अवैध धंद्यांविरोधातील त्यांच्या कारवाईची विशेष दखल घेतली जाते. जुगार, मटका, अवैध वाळू व मुरूम वाहतूक तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर त्यांनी सातत्याने धडक कारवाया केल्या. गुन्हेगारीला आळा घालण्याबरोबरच कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी त्यांनी कठोर भूमिका घेतली. मात्र, कठोर अंमलबजावणीसोबतच माणुसकीचा दृष्टिकोन जपणे, आरोपींकडे केवळ गुन्हेगार म्हणून न पाहता पुरावे, संवाद आणि मानसशास्त्रीय पद्धतीने चौकशी करणे, ही त्यांच्या कामाची वेगळी वैशिष्ट्ये ठरली.
तपासातील कौशल्य, शिस्तप्रिय नेतृत्व, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख दृष्टिकोन या गुणांच्या बळावर शंकरराव शेळके यांनी पोलीस दलात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. वाशिम येथे डीवायएसपीपदी झालेली त्यांची पदोन्नती ही त्यांच्या प्रदीर्घ, यशस्वी आणि उल्लेखनीय सेवाकार्याचीच पोचपावती मानली जात आहे.

