Sahakar: तब्बल १८ वर्षांनंतर झालेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी १९ जागांवर विजय मिळवत बँकेवरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. मतदानापूर्वीच १२ जागा बिनविरोध मिळविल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीतही नऊपैकी सात जागा जिंकत सहकार पॅनेलने आपली राजकीय व सहकार क्षेत्रातील ताकद दाखवून दिली. दुसरीकडे आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनेल’ने दोन जागा जिंकत संचालक मंडळात विरोधकांचे अस्तित्व कायम ठेवले.

शिंगणे-जाधवांच्या सहकाराची सरशी; मनोज कायंदेंच्या परिवर्तनने दोन जागा जिंकत वेधले लक्ष
गजानन तिडके
बुलढाणा : तब्बल १८ वर्षांनंतर झालेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी १९ जागांवर विजय मिळवत बँकेवरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. मतदानापूर्वीच १२ जागा बिनविरोध मिळविल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीतही नऊपैकी सात जागा जिंकत सहकार पॅनेलने आपली राजकीय व सहकार क्षेत्रातील ताकद दाखवून दिली. दुसरीकडे आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘स्व. अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनेल’ने दोन जागा जिंकत संचालक मंडळात विरोधकांचे अस्तित्व कायम ठेवले.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजप, शिवसेना, काँग्रेस, उद्धवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध प्रवाहांतील स्थानिक नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्यात सहकार पॅनेलला यश आले. त्यामुळे हा निकाल केवळ एका पक्षाचा विजय न मानता जिल्ह्यातील विविध राजकीय शक्तींच्या सहकार क्षेत्रातील जुळवाजुळवीला मिळालेला कौल मानला जात आहे. मात्र परिवर्तन पॅनेलच्या दोन विजयांमुळे संचालक मंडळ पूर्णतः एकतर्फी झालेले नाही.
निवडणुकीपूर्वीच प्राथमिक कृषी पतसंस्था मतदारसंघातून मयूर गणेश बाहेकर (बुलढाणा), अंकुशराव व्यंकटेश पाटील (चिखली), संजय रामभाऊ गायकवाड (मोताळा), राजेश रमेशराव देशमुख (नांदुरा), पांडुरंग पुरुषोत्तम पाटील (शेगाव), दिनेश राजाराम काळणे (खामगाव), प्रसेनजित किसन तायडे पाटील (जळगाव जामोद), प्रतापराव गणपतराव जाधव (मेहकर), डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे (सिंदखेड राजा) आणि कावेरी समाधान सोनसळे (देऊळगाव राजा) हे बिनविरोध निवडून आले.
विमुक्त जाती-भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गातून जालिंदर आश्रुबा बुधवत, तर कृषी पणन व शेतमाल प्रक्रिया संस्था मतदारसंघातून आकाश पांडुरंग फुंडकर यांचीही बिनविरोध निवड झाली.
प्रत्यक्ष लढतीत सहकार पॅनेलचे सात, परिवर्तनचे दोन
प्रत्यक्ष झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलचे गोविंद मिरगे, संजय रायमुलकर, सुनील उदयकार, अस्मिता हेलगे, पुष्पाताई बारवकर, गोविंद मापारी आणि श्रीकांत मारोडे यांनी विजय मिळविला. तर परिवर्तन पॅनेलचे ज्ञानेश्वर पाटील यांनी नागरी बँका-पतसंस्था मतदारसंघातून ६१५ मते मिळवत विजय मिळविला. मलकापूर कृषी संस्था मतदारसंघातून परिवर्तन पॅनेलचे शिवचंद्र तायडे यांनी १८ मते मिळवत विजय मिळविला.
या दोन जागांमुळे सत्ताधारी संचालक मंडळात विरोधकांना आपली भूमिका मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे बँकेच्या आगामी कारभारात या दोन संचालकांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.
मतदानाची टक्केवारी वाढल्याने निकालाची होती उत्सुकता
या निवडणुकीत एकूण १ हजार ८५७ मतदारांपैकी तब्बल १ हजार ७५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ९४.०३ इतकी राहिली. इतर सहकारी संस्था मतदारसंघात १०० टक्के मतदान झाले. ग्रामसेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात ९८.०६ टक्के, कृषी उत्पन्न प्रक्रिया मतदारसंघात ९६ टक्के, तर नागरी पतसंस्था मतदारसंघात ९२.०२ टक्के मतदान झाले.
तालुकानिहाय मतदानात बुलढाणा येथे २३८, चिखली १९९, मलकापूर १०८, मोताळा १६४, नांदुरा ११३, शेगाव ११३, खामगाव ९७, जळगाव जामोद ११५, संग्रामपूर १२५, मेहकर १३८, लोणार १०४, सिंदखेडराजा १२८ आणि देऊळगाव राजा येथे १०९ मतदारांनी मतदान केले.
राजेंद्र शिंगणेंचा प्रभाव कायम
सहकार क्षेत्रात डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा प्रभाव असल्याचे या निकालातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यातील विविध राजकीय गटांना सोबत घेऊन सहकार क्षेत्रातील समीकरणे मजबूत करण्याची परंपरा दिवंगत भास्करराव शिंगणे यांनी रुजविली. ती परंपरा पुढे नेण्यात डॉ. राजेंद्र शिंगणे यांना यश आले असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.
आमदार मनोज कायंदेचा सहकारातही प्रभाव
दुसरीकडे आमदार मनोज कायंदे यांनी परिवर्तनाचा नारा देत निवडणुकीत आव्हान उभे केले. मात्र २१ पैकी १९ जागांवर सहकार पॅनेलचा विजय झाला असला तरी सहकार क्षेत्रात नवखे असलेल्या मनोज कायंदे यांनी दोन जागा जिंकत सहकारातही आपला प्रभाव असल्याचे सिध्द केले. अवघ्या काही वेळात उमेदवार दिल्यावरही दोन जागा जिंकत आमदार कायंदे यांनी दिग्गजांना आव्हान दिले आणि यशही मिळवले आहे.
संचालक मंडळासमोर आव्हाने
सहकार पॅनेलला मोठे बहुमत मिळाले असले तरी आता या संचालक मंडळासमोर बँकेचा सक्षम आणि पारदर्शक कारभार करण्याचे आव्हान आहे. निवडणुकीदरम्यान चर्चेत राहिलेले ३०० कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन हे अनुदान नसून परतफेडीचे कर्ज असल्याने त्याची वसुली, सुरक्षित पतपुरवठा, ठेवीदारांचा विश्वास आणि आर्थिक शिस्त ही नव्या संचालक मंडळाची खरी परीक्षा ठरणार आहे.
विशेष म्हणजे २१ पैकी १७ संचालक प्रथमच संचालक मंडळावर आले आहेत. त्यामुळे नव्या चेहऱ्यांची ऊर्जा आणि अनुभवी संचालकांचा अनुभव यांचा समन्वय साधत बँकेचा कारभार किती प्रभावीपणे केला जातो, याकडे आता सभासदांचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड अद्याप बाकी असली तरी १९ संचालकांच्या संख्याबळामुळे सहकार पॅनेलचा मार्ग तुलनेने सुकर मानला जात आहे.

