Sadanand Bhuskute : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सदानंद भुस्कुटे यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या बाळापूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १९ ऑगस्ट रोजी ही नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची तळमळ, समाजाप्रती असलेला आदर आणि महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

सामाजिक कार्याची दखल; सदानंद भुस्कुटेंच्या खांद्यावर माळी महासंघाची तालुका संघटनाची धुरा
राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सदानंद भुस्कुटे यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या बाळापूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. १९ ऑगस्ट रोजी ही नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या सामाजिक कार्याची तळमळ, समाजाप्रती असलेला आदर आणि महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
माळी समाजातील विविध शाखांमध्ये एकोपा निर्माण करणे, समाजाच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करणे तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देण्याच्या उद्देशाने भुस्कुटे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तीन महिन्यांत कार्यकारिणी गठित करण्याची जबाबदारी
नवनियुक्त तालुकाध्यक्ष सदानंद भुस्कुटे यांनी बाळापूर तालुक्यातील माळी समाजबहुल गावांचा दौरा करून समाजबांधवांशी संवाद साधावा, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि संघटनेची तालुका कार्यकारिणी गठित करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तीन महिन्यांच्या आत कार्यकारिणी गठित करून त्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र
अखिल भारतीय माळी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुभाष सातव, महाराष्ट्र राज्य संघटक गणेश काळपांडे, अकोला जिल्हाध्यक्ष ॲड. प्रकाश दाते, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. नितीन देऊळकर, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक रहाटे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा कल्पनाताई तायडे आणि जिल्हा सचिव मनोहर उगले यांच्या वतीने सदानंद भुस्कुटे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
सदानंद भुस्कुटे यांच्या नियुक्तीचे वाडेगाव तसेच बाळापूर तालुक्यातील समाजबांधवांकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या माध्यमातून माळी समाजाच्या संघटनात्मक बळकटीकरणाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

