cotton farming : शेतीसमोरील वाढती आव्हाने, पावसातील अनिश्चितता, पिकांवरील किडी-रोगांचा प्रादुर्भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करण्यासाठी पातूर कृषी विभागातील सहायक कृषी अधिकारी चक्क गायनाच्या माध्यमातून ‘शेती शाळा’ घेत आहेत. त्यांच्या स्वरचित गीतातून कापूस शेतीसह पिकांची मशागत, कीड-रोग व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीचे मार्गदर्शन केले जात असल्याने हा अनोखा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

शेताच्या बांधावर गायले गीत अन् दिले शेतीचे धडे; कृषी अधिकाऱ्यांचा अनोखा उपक्रम चर्चेत
राहुल सोनोने
वाडेगाव : शेतीसमोरील वाढती आव्हाने, पावसातील अनिश्चितता, पिकांवरील किडी-रोगांचा प्रादुर्भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करून त्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन करण्यासाठी पातूर कृषी विभागातील सहायक कृषी अधिकारी चक्क गायनाच्या माध्यमातून ‘शेती शाळा’ घेत आहेत. त्यांच्या स्वरचित गीतातून कापूस शेतीसह पिकांची मशागत, कीड-रोग व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीचे मार्गदर्शन केले जात असल्याने हा अनोखा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.
पातूर कृषी विभागांतर्गत सस्ती, उमरा, पांगरा, सावरगाव, झरंडी, वसाळी आदी गावांमध्ये शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीविषयक मार्गदर्शन केले जात आहे. पारंपरिक पद्धतीने केवळ व्याख्यान न देता गाणे आणि काव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा अभिनव प्रयोग करण्यात येत आहे.
गीतातून शेतीचे मार्गदर्शन
‘नाही कुणी मालक माझा, नाही मी कुणाचा गडी; माझी आहे सुंदर शेतीवाडी’ अशा स्वरचित गीतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पिकांची योग्य मशागत कशी करावी, कापूस पिकातील किडींचे व्यवस्थापन कसे करावे, पिकांची निगा कशी राखावी, तसेच उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून उत्पादन कसे वाढवावे, याबाबत गीतातून सहज आणि मनोरंजक पद्धतीने माहिती दिली जाते.
या मार्गदर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर तो शेतकरी आणि नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. शेतीविषयक तांत्रिक माहिती गाण्याच्या माध्यमातून सहज समजावून सांगितली जात असल्याने शेतकऱ्यांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न
पावसाचा खंड, पिकांचे नुकसान आणि वाढता शेती खर्च यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनातील नकारात्मकता आणि भीती दूर करून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी शेताच्या बांधावरच संवाद साधत कृषीविषयक मार्गदर्शन करण्याचा हा उपक्रम उपयुक्त ठरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणाऱ्या या शेती शाळेसाठी सहायक कृषी अधिकारी अरुण ताले, मंगेश लासुरकर आणि पिंपळखुटा यांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले कृषी मार्गदर्शन
शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणे, पिकांची पाहणी करणे आणि त्याच ठिकाणी उपाययोजना सांगणे, यामुळे कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होत आहे. गायनाच्या माध्यमातून दिले जाणारे हे मार्गदर्शन शेतकऱ्यांना भावत असून, ग्रामीण भागात कृषी विस्तारासाठी हा उपक्रम वेगळा आणि प्रभावी ठरत आहे.

