district annual plan : पुढील आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) प्रारूप आराखड्याचा आढावा मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला.

यवतमाळ : पुढील आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) प्रारूप आराखड्याचा आढावा मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला.
या बैठकीला सह्याद्री अतिथीगृह येथे पालकमंत्री ना. संजय राठोड उपस्थित होते, तर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे आमदार किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, प्रकल्प संचालक अमित रंजन, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी जिल्हा वार्षिक योजनेसह पूर संरक्षण भिंत बांधकाम, आरोग्य सुविधांसाठी अत्याधुनिक उपकरणांची खरेदी, पंचायत समिती इमारतींचे बांधकाम, नवीन पोलीस स्थानके तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी आवश्यक निधीची गरज असल्याचे अधोरेखित केले.
तसेच जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत प्रस्तावित व तरतूद केलेल्या कामांची सविस्तर माहिती देत निधी मंजुरीची मागणी केली. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक प्रकल्पांना प्राधान्य देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

