Revenue office: मेहकर येथील जुने तहसील कार्यालय परिसरात असलेल्या ग्राम महसूल अधिकारी भाग-०२ कार्यालयाच्या प्रवेशद्वारास अज्ञात व्यक्तींनी ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत कार्यालयाच्या मुख्य दरवाज्याचे नुकसान झाले असून कार्यालयाच्या भिंती व दर्शनी भाग धुरामुळे विद्रूप झाला आहे. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी शिवशंकर आत्माराम निकस यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाच्या दरवाजा जळाला; प्रशासन सतर्क, पोलिसांत तक्रार
मेहकर : मेहकर येथील जुने तहसील कार्यालय परिसरात असलेल्या ग्राम महसूल अधिकारी भाग-०२ कार्यालयाच्या प्रवेशद्वारास अज्ञात व्यक्तींनी ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत कार्यालयाच्या मुख्य दरवाज्याचे नुकसान झाले असून कार्यालयाच्या भिंती व दर्शनी भाग धुरामुळे विद्रूप झाला आहे. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी शिवशंकर आत्माराम निकस यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
शिवशंकर निकस (वय ३८), ग्राम महसूल अधिकारी, मेहकर भाग-०२, हे मागील चार वर्षांपासून या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार, १७ जून रोजी नेहमीप्रमाणे कार्यालयीन कामकाज पूर्ण करून सायंकाळी सुमारे ६ वाजता त्यांनी आणि महसूल सेवक विशाल गोविंद राऊत यांनी कार्यालय बंद केले होते.
दरम्यान, १८ जून रोजी पहाटे सुमारे ५.१० वाजता महसूल सेवक विशाल राऊत यांनी फोनवरून निकस यांना माहिती दिली की, नव्या ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अज्ञात व्यक्तींनी काही ज्वलनशील पदार्थ व कागद पेटवून दिले आहेत. त्यामुळे कार्यालयाच्या मुख्य दरवाज्यालाही आग लागून नुकसान झाले आहे.
माहिती मिळताच शिवशंकर निकस यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाल्याचे दिसून आले. तसेच घटनास्थळापासून काही अंतरावर “फसव्या कर्जमाफीचा जाहीर निषेध… रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची दखल घ्या…” अशा आशयाचे ए-४ आकाराचे मुद्रित पत्रक आढळून आले. त्यामुळे या घटनेमागील हेतूबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.
घटनेची माहिती मिळताच निकस यांनी प्रभारी तहसीलदार नालट तसेच उपविभागीय अधिकारी जोगी यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रारीनुसार, १७ जून रोजी सायंकाळी ६ ते १८ जून रोजी पहाटे ५ या कालावधीत अज्ञात व्यक्तींनी शासकीय इमारतीचे नुकसान करण्याच्या उद्देशाने ज्वलनशील पदार्थाचा वापर करून आग लावली. या घटनेत कार्यालयाच्या दरवाज्याचे अंदाजे चार ते साडेचार हजार रुपयांचे नुकसान झाले असून इमारतीच्या दर्शनी भागालाही धुरामुळे हानी पोहोचली आहे.
या घटनेमुळे तहसील परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. शासकीय कार्यालयावर झालेल्या या प्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

