Mahabreaking

[breaking_news]

New twist :बाभुळगाव जहागीर प्रकरणाला नवे वळण; मुस्लिम समाजाची निष्पक्ष चौकशीची मागणी

New twist : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभुळगाव जहागीर येथे १५ जून रोजी दोन युवकांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे गंभीर गुन्ह्यात रूपांतर करून एका समाजातील युवकांवर एकतर्फी कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

New twist

अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभुळगाव जहागीर येथे १५ जून रोजी दोन युवकांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे गंभीर गुन्ह्यात रूपांतर करून एका समाजातील युवकांवर एकतर्फी कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

निवेदनानुसार, १५ जून रोजी रात्री सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी चालविताना कॅनचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन युवकांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. मात्र, दोन युवकांमधील वैयक्तिक भांडणाला काही समाजकंटक आणि बाहेरील राजकीय घटकांनी जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे की, गावात तलवार व चाकूने हल्ला झाल्याच्या तसेच बौद्धविहारातील मूर्तीची विटंबना झाल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या. मात्र, या दाव्यांमध्ये कोणतीही सत्यता नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तक्रारदाराने समाजातील लोकांना एकत्र करून पोलिसांवर दबाव टाकत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रत्यक्षात भांडणात मोजकेच युवक सहभागी होते, मात्र ३३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी सहा जणांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, उपसरपंच शाहरुख पठाण व वाहेद खान पठाण यांच्यासह काही व्यक्तींची नावे गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. संबंधित व्यक्ती घटना घडली त्यावेळी इतर ठिकाणी कामावर असल्याचा दावा करण्यात आला असून त्याबाबत पुरावे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी पोलिसांनी दोन्ही गटांवर कारवाई करण्याऐवजी केवळ एका गटावरच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर निष्पक्ष चौकशी करून निर्दोष नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर अतिक खान पठाण, शेख कहर, मुस्ताक ठेकेदार, ग्रामपंचायत सदस्य तोसिफ खान पठाण, डॉ. साजिद खान पठाण, अमजद खान पठाण, शेख साजिद आदींसह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, या आरोपांबाबत पोलिस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top