Revenue Department cracks down: तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत सलग कारवाया सुरू केल्या आहेत. उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने टाकरखेड भागिले शिवार आणि खल्याळगव्हाण येथे धडक कारवाया करत अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले. या कारवाईमुळे तालुक्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले असून महसूल प्रशासनाने अवैध उत्खननाविरोधातील मोहीम आणखी तीव्र केल्याचे स्पष्ट झाले आहे.

धरण कमानीजवळ रेती वाहतूक पकडली; तहसीलदारांच्या पथकाची धडक कारवाई
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत सलग कारवाया सुरू केल्या आहेत. उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वात महसूल पथकाने टाकरखेड भागिले शिवार आणि खल्याळगव्हाण येथे धडक कारवाया करत अवैध रेती वाहतूक करणारे दोन टिप्पर पकडले. या कारवाईमुळे तालुक्यातील रेती माफियांचे धाबे दणाणले असून महसूल प्रशासनाने अवैध उत्खननाविरोधातील मोहीम आणखी तीव्र केल्याचे स्पष्ट झाले आहे.
महसूल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, ७ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास टाकरखेड भागिले शिवारातील धरण कमानीजवळ अवैध रेती वाहतूक करणारा एक टिप्पर निदर्शनास आला. महसूल पथकाने तातडीने कारवाई करत हा टिप्पर पकडला. पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी संबंधित वाहन देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अटकावून ठेवण्यात आले आहे. या कारवाईत मंडळ अधिकारी विजय हिरवे आणि ग्राम महसूल अधिकारी, मेहुणा राजा संजय बरांडे यांनी सहभाग घेतला. प्राथमिक चौकशीत संबंधित टिप्पर हा आकाश काळे, रा. चिखली यांचा असल्याचे टिप्पर चालकाने सांगितल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली.
यापूर्वीही महसूल प्रशासनाने ३० जून रोजी मध्यरात्री खल्याळगव्हाण येथे अशाच प्रकारची धडक कारवाई केली होती. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करणारा सुमारे तीन ब्रास रेती असलेला टिप्पर पकडण्यात आला होता. हा टिप्परही पुढील दंडात्मक कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अटकावून ठेवण्यात आला. त्या कारवाईत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्यासह महसूल सेवक कविता शिरसाट यांनी सहभाग घेतला होता.
तालुक्यातील नदीपात्रांमधून आणि धरण परिसरातून सुरू असलेल्या अवैध रेती उपशामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असून पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रांतील बेकायदा उत्खननामुळे भूक्षरण, प्रवाहात अडथळे आणि नैसर्गिक समतोल बिघडण्याची शक्यता अधिक वाढते. अशा परिस्थितीत महसूल प्रशासनाने उचललेली कारवाई ही केवळ दंडात्मक नसून रेती माफियांना थेट इशारा मानली जात आहे.
दरम्यान, तालुक्यात अवैध रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. सलग दोन कारवायांमुळे महसूल यंत्रणा आता अधिक सतर्क झाल्याचे चित्र आहे. पुढील काळातही अवैध रेती माफियांवर अशीच धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे महसूल विभागाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

