average rainfall: जिल्ह्यात मान्सूनने समाधानकारक हजेरी लावली असून ७ जुलै २०२६ पर्यंत जिल्ह्यात एकूण १६२.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद जिल्ह्याच्या सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या २१.३४ टक्के इतकी आहे. मागील वर्षी याच कालावधीत १७९.७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.

८ जुलैनंतर राज्यातील बहुतांश भागांत पावसात घट होण्याचा अंदाज
बुलढाणा : जिल्ह्यात मान्सूनने समाधानकारक हजेरी लावली असून ७ जुलै २०२६ पर्यंत जिल्ह्यात एकूण १६२.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद जिल्ह्याच्या सरासरी वार्षिक पर्जन्यमानाच्या २१.३४ टक्के इतकी आहे. मागील वर्षी याच कालावधीत १७९.७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार मेहकर तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक २४२.१ मि.मी. पाऊस झाला असून, तो तालुक्याच्या सरासरीच्या २८.८७ टक्के आहे. त्याखालोखाल बुलढाणा तालुक्यात २०९.८ मि.मी. (२४.३८ टक्के), मोताळा येथे १७६.२ मि.मी. (२४.७३ टक्के), देऊळगाव राजा येथे १७१.७ मि.मी. (२४.३७ टक्के) आणि शेगाव येथे १६९.० मि.मी. (२४.७६ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये लोणार येथे १७१.६ मि.मी., सिंदखेड राजा येथे १७१.० मि.मी., चिखली येथे १६७.४ मि.मी., जळगाव जामोद येथे १५२.७ मि.मी., नांदुरा येथे १५०.६ मि.मी., संग्रामपूर येथे १२८.४ मि.मी., खामगाव येथे १०५.८ मि.मी. आणि मलकापूर येथे ९७.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
महसूल विभागाच्या पर्जन्यमान विश्लेषणानुसार १ ते ७ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी ५३.४ मि.मी. पाऊस झाला असून, या कालावधीतील सरासरीच्या २७.८ टक्के पाऊस नोंदविण्यात आला आहे. या सात दिवसांत जिल्ह्यात सरासरी सहा पावसाळी दिवसांची नोंद झाली आहे. मंडळनिहाय आकडेवारीत मेहकर तालुक्यातील अंजनी मंडळात १२७.० मि.मी., संग्रामपूर मंडळात ११०.४ मि.मी., मेहकर मंडळात १०३.८ मि.मी., बुलढाणा तालुक्यातील म्हसळा मंडळात ९८.९ मि.मी., मोताळा मंडळात ९६.९ मि.मी. तसेच देऊळगाव राजा शहर मंडळात ९२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार ८ जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती किमान पुढील १० दिवस कायम राहू शकते. जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी खानदेश, मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे चित्र आहे.
राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे ज्या भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्या ठिकाणी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

