Mahabreaking

[breaking_news]

Rain gives the slip :साखरखेर्डासह सिंदखेडराजा तालुक्यात पावसाची हुलकावणी; खरीप पिके धोक्यात

Rain gives the slip :संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, असे शेतकरी स्प्रिंकलरच्या साह्याने पिकांना पाणी देत आहेत. मात्र, पाण्याची पातळी आधीच खालावल्याने ही व्यवस्था किती दिवस टिकणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

  Rain gives the slip

  पावसाने पाठ फिरवली, शेतकऱ्यांची धावपळ वाढली; स्प्रिंकलरने पिके जगविण्याची धडपड

साखरखेर्डा  : संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खरीप पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, असे शेतकरी स्प्रिंकलरच्या साह्याने पिकांना पाणी देत आहेत. मात्र, पाण्याची पातळी आधीच खालावल्याने ही व्यवस्था किती दिवस टिकणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

जून महिन्यातच पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असतानाही शेतकऱ्यांनी पेरणी केली. अधूनमधून झालेल्या रिमझिम पावसामुळे सुरुवातीला पिकांना आधार मिळाला आणि पिके बहरली. मात्र, ऑगस्ट महिन्यात परिस्थिती अधिक गंभीर झाली. ऑगस्टमध्ये तालुक्याची सरासरी पर्जन्यमानाची नोंद १८४.०५ मिलिमीटर असताना प्रत्यक्षात केवळ ४० मिलिमीटर पाऊस झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातही काही भागांत पाऊस झाला, तर अनेक ठिकाणी जमीन कोरडीच राहिली.

पिकांना जीवदान मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या पावसाची प्रतीक्षा कायम असताना आभाळ दाटून येते; मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सप्टेंबर महिन्याला आठवडा उलटून गेला तरी पावसाचा पत्ता नसल्याने कडक उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सध्या सोयाबीन पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, या कालावधीत पावसाची नितांत गरज आहे. पाऊस न झाल्याने कोरडवाहू शेतीतील सोयाबीनची पाने वाळू लागली असून फुलोरा गळून पडत आहे. कपाशी व तूर पिकांची अवस्थाही बिकट झाली आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर उभे पीक सुकत असल्याचे चित्र आहे.

ज्यांच्याकडे विहीर, बोअरवेल अथवा अन्य ओलिताची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून पिकांना पाणी देत आहेत. मात्र, तालुक्यातील तलाव, विहिरी आणि मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची पातळीही कमी झाली असल्याने आगामी काळात सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यात आतापर्यंत ५५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याचा दावा केला जात असून, पाणीसाठ्याची स्थितीही चिंताजनक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत व सवलती द्याव्यात, अशी मागणी सातत्याने होत आहे.

शेतकऱ्यांसमोर चोरीचेही संकट

एकीकडे पावसाअभावी पिके वाचविण्यासाठी शेतकरी रात्री-दिवस धडपड करीत असताना दुसरीकडे शेतातील साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची तक्रार आहे. शेतात पाणी देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्प्रिंकलरच्या तोट्या चोरट्यांकडून काढून नेल्या जात आहेत. तसेच काही ठिकाणी सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांच्या केबल व वायरी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

सततच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजपर्यंत झालेल्या काही चोरीच्या घटनांचा तपास लागला नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाचे संकट आणि चोरीचे संकट अशा दुहेरी कोंडीत शेतकरी सापडला आहे.

दरम्यान, रात्रीच्या वेळी चोरटे घरफोड्या करीत असल्याचीही चर्चा असून, काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हातात लोखंडी रॉड घेऊन संशयित व्यक्ती फिरताना दिसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहून रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. तसेच पोलिसांनी चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top