After solar wires: सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी काटे परिसरात शेतातील विद्युत साहित्य चोरीच्या घटनांनी शेतकरी हैराण झाले आहेत. सौरऊर्जा प्रकल्पाच्या केबल वायर आणि स्प्रिंकलरच्या तोट्या चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता चोरट्यांनी थेट विद्युत तारांवर डल्ला मारला आहे. दादाराव हिवाळे यांच्या शेतातील रोहित्रापासून (डीपी) शेतापर्यंत जाणाऱ्या विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेल्या आहेत.

शेतातील विद्युत तारा चोरट्यांनी पळवल्या; पांगरी काटे परिसरात चोरट्यांची दहशत
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी काटे परिसरात शेतातील विद्युत साहित्य चोरीच्या घटनांनी शेतकरी हैराण झाले आहेत. सौरऊर्जा प्रकल्पाच्या केबल वायर आणि स्प्रिंकलरच्या तोट्या चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता चोरट्यांनी थेट विद्युत तारांवर डल्ला मारला आहे. दादाराव हिवाळे यांच्या शेतातील रोहित्रापासून (डीपी) शेतापर्यंत जाणाऱ्या विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी कापून चोरून नेल्या आहेत.
शेतातील विद्युत तारा चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. पांगरी काटे शिवारातील शेतात असलेल्या रोहित्रातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत विद्युत तारा कापून नेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेत रोहित्राखालील फ्युज बॉक्सही फोडण्यात आला असून आतील साहित्याची नासधूस करण्यात आली आहे.
विद्युत तारा चोरीला गेल्यामुळे शेतातील मोटारपंप बंद पडले आहेत. परिणामी उभ्या पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या पावसाने खंड दिल्याने पिकांना पाण्याची गरज असताना ही चोरी झाल्याने पिके करपण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चोरीच्या घटनांची मालिका
पांगरी काटे परिसरात शेतातील साहित्य चोरीच्या घटनांची मालिका सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अवघ्या चार-पाच दिवसांपूर्वी परिसरातील सात शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलरच्या तोट्या चोरून नेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता विद्युत तारांची चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीही शेतातील सौरऊर्जा प्रकल्पावरील केबल वायर चोरीला जाणे, स्प्रिंकलरच्या तोट्या काढून नेणे आणि आता विद्युत तारा तोडून नेणे, अशा घटना घडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आधीच पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट झाली असताना शेतीसाठी आवश्यक विद्युत साहित्यही चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे.
या घटनेची माहिती महावितरण तसेच साखरखेर्डा पोलीस ठाण्याला देण्यात आली आहे. मात्र, अद्याप चोरट्यांचा शोध लागलेला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विद्युत साहित्य चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि महावितरणने चोरी झालेल्या विद्युत तारा तातडीने बसवून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पांगरी काटे परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

