Mahabreaking

[breaking_news]

Rain gives the slip :पावसाने फिरवली पाठ; दुबार पेरणी, करपणारी पिके आणि शेतकऱ्यांसमोर नवे संकट

Rain gives the slip : पावसाने पुन्हा एकदा ओढ दिल्याने साखरखेर्डा परिसरातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. पेरणीनंतर उगवलेली पिके कडक उन्हामुळे आणि कोरड्या वाऱ्यांमुळे करपू लागली असून, शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. पुढील चार ते पाच दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Rain gives the slip

 साखरखेर्डा परिसरात खरीप धोक्यात; अपुऱ्या पावसाने पिकांनी टाकली मान

अशोक इंगळे

साखरखेर्डा : पावसाने पुन्हा एकदा ओढ दिल्याने साखरखेर्डा परिसरातील खरीप हंगाम गंभीर संकटात सापडला आहे. पेरणीनंतर उगवलेली पिके कडक उन्हामुळे आणि कोरड्या वाऱ्यांमुळे करपू लागली असून, शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. पुढील चार ते पाच दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

परिसरात मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर आणि तीळ या पिकांची पेरणी पूर्ण झाली असली, तरी अनेक ठिकाणी उगवण समाधानकारक झालेली नाही. विशेषतः सोयाबीनची बियाणे अनेक शेतांमध्ये उगवलीच नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे आधीच वाढलेल्या बियाणे व खतांच्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार पडला आहे.

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने खरीप पेरण्या नेहमीपेक्षा उशिरा झाल्या. त्यापूर्वी रोहिणी आणि मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मूग, उडीद आणि कापूस या पिकांसाठी मृग नक्षत्रातील पाऊस महत्त्वाचा मानला जातो. मात्र यंदा ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्याने पेरणीचे नियोजन विस्कळीत झाले.

आद्रा नक्षत्रात काही भागांत दमदार तर काही ठिकाणी वादळी पाऊस झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या केल्या. मात्र, काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे बियाणे जमिनीत दबून गेल्याने उगवण झाली नाही, तर काही भागात वापसा नसल्याने पेरण्या लांबल्या. परिणामी अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.

आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे विहिरी आणि तलावांतील पाण्याची पातळी आधीच खालावलेली आहे. त्यातच पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांना संरक्षणात्मक पाणी देण्याचीही शेतकऱ्यांची क्षमता मर्यादित झाली आहे.

शेतकरी सांगतात की, सध्याच्या परिस्थितीत तातडीने दमदार पाऊस झाला तरच पिकांना जीवदान मिळू शकते. अन्यथा दुबार पेरणी केलेली पिकेही धोक्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कृषी विभागाने गावोगावी भेटी देऊन शेतकऱ्यांना पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावे, पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करावे तसेच आवश्यक त्या उपाययोजना आणि शासनाच्या योजनांची माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top