Protest march : शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध तसेच नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या विरोधात गुरुवारी बोरगाव मंजू येथे वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले होते.

नीट पेपरफुटी व विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बोरगाव मंजू बंद; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
बोरगाव मंजू : शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईचा निषेध तसेच नीट पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या विरोधात गुरुवारी बोरगाव मंजू येथे वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार येथून मोर्चाला प्रारंभ झाला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून नगरप्रदक्षिणा काढत मोर्चेकऱ्यांनी बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, शिक्षण क्षेत्रातील वाढता गोंधळ व कथित भ्रष्टाचाराला आळा घालावा, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, तसेच ‘एक देश, एक परीक्षा’ धोरणाचा पुनर्विचार करून राज्यस्तरावर परीक्षा घेण्याची व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
आंदोलनाला प्रतिसाद देत शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. वंचित बहुजन आघाडीसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक या आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान, आंदोलन शांततेत पार पडावे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील वानखडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

