Borgaon Manju : परिसरातील लोकसंख्या, वाहतूक आणि गुन्हेगारीचे वाढते स्वरूप लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम पोलिस यंत्रणा आवश्यक आहे. मात्र, बोरगाव मंजू पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या तब्बल ७२ गावांतील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ चार अधिकारी आणि ५६ पोलिस कर्मचाऱ्यांवर असल्याचे वास्तव समोर आले आहे. मंजूर पदांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर प्रचंड ताण पडत असून, अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.

रिक्त पदांमुळे वाढला पोलिसांवरील ताण; अतिरिक्त मनुष्यबळाची गरज
बोरगाव मंजू : परिसरातील लोकसंख्या, वाहतूक आणि गुन्हेगारीचे वाढते स्वरूप लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सक्षम पोलिस यंत्रणा आवश्यक आहे. मात्र, बोरगाव मंजू पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या तब्बल ७२ गावांतील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ चार अधिकारी आणि ५६ पोलिस कर्मचाऱ्यांवर असल्याचे वास्तव समोर आले आहे. मंजूर पदांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असल्याने उपलब्ध मनुष्यबळावर प्रचंड ताण पडत असून, अतिरिक्त पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.
बोरगाव मंजू हे अकोला शहरालगतचे महत्त्वाचे गाव असून, रेल्वे स्थानक आणि राष्ट्रीय महामार्गामुळे येथे लोकसंख्या व दैनंदिन वर्दळ सातत्याने वाढत आहे. नव्या भारतीय फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी, वाढते प्रशासकीय कामकाज, गुन्ह्यांच्या तपासातील बदल आणि प्रतिबंधात्मक कारवायांमुळे पोलिसांवरील जबाबदाऱ्या अधिक वाढल्या आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलिस स्टेशनमध्ये एक पोलिस निरीक्षक, पाच पोलिस उपनिरीक्षक, १८ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, २५ हेडकॉन्स्टेबल, २० नाईक पोलिस कॉन्स्टेबल आणि ६७ पोलिस कॉन्स्टेबल अशी पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात एक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक, पाच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, २० हेडकॉन्स्टेबल, दोन नाईक पोलिस कॉन्स्टेबल आणि २९ पोलिस कॉन्स्टेबल कार्यरत आहेत.
यामुळे दोन पोलिस उपनिरीक्षक, १३ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, पाच हेडकॉन्स्टेबल, १८ नाईक पोलिस कॉन्स्टेबल आणि ३८ पोलिस कॉन्स्टेबल अशी एकूण ७६ पदे रिक्त आहेत. कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी काही जण इतर ठिकाणी संलग्न असल्याने प्रत्यक्ष उपलब्ध मनुष्यबळ आणखी कमी असल्याचे सांगितले जाते.
विशेष म्हणजे, पोलिस स्टेशनची मंजूर पदसंख्या २०१० च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या निकषांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर परिसरातील लोकसंख्या, गावांची संख्या, वाहतुकीचा व्याप आणि गुन्हेगारीचे स्वरूप यात मोठी वाढ झाली आहे. मात्र, त्यानुसार मनुष्यबळात वाढ करण्यात आलेली नाही.
याशिवाय, अनेक गावांमध्ये पोलिस पाटलांची पदेही रिक्त असल्याने गावपातळीवरील किरकोळ वाद, तक्रारी आणि प्राथमिक समन्वयाची जबाबदारीही थेट पोलिसांवर येत आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा तपास, प्रतिबंधात्मक कारवाया, न्यायालयीन कामकाज, वाहतूक नियंत्रण आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडताना अधिकारी व कर्मचारी मोठ्या तणावाखाली काम करत आहेत.
वाढत्या लोकसंख्येच्या आणि वाढत्या कामकाजाच्या पार्श्वभूमीवर बोरगाव मंजू पोलिस स्टेशनमधील रिक्त पदे तातडीने भरून अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

