Prof. Jogendra Kawade : बहुजन चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बोरगाव मंजू येथे भेट देत दिवंगत सामाजिक कार्यकर्ते अशोक वानखडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्या निधनामुळे बहुजन चळवळीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

“युवकांनी उद्योजक बनावे” – कवाडे यांचे मार्गदर्शन; वानखडे कुटुंबीयांची भेट
संजय तायडे
बोरगाव मंजू : बहुजन चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी बोरगाव मंजू येथे भेट देत दिवंगत सामाजिक कार्यकर्ते अशोक वानखडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्या निधनामुळे बहुजन चळवळीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष तसेच आदित्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशोक वानखडे यांचे २४ मार्च २०२६ रोजी निधन झाले होते. त्यानंतर २६ मार्च रोजी प्रा. कवाडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यानंतर त्यांनी ‘तपोभूमी’चे मुख्य संपादक रमेश समुद्रे यांच्या पत्नी शिलाबाई समुद्रे यांच्या निधनाबद्दलही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन शोक व्यक्त केला. दरम्यान, सिद्धार्थ नगर येथील आम्रपाली बुद्ध विहारात प्रा. कवाडे यांनी सदिच्छा भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सिद्धार्थ नवयुवक मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी उपस्थित युवकांना मार्गदर्शन करताना प्रा. कवाडे म्हणाले की, “युवकांनी उच्च शिक्षण घेऊन व्यसनमुक्त राहावे आणि उद्योग-व्यवसायात उतरून उद्योजक बनावे. उद्योजक व्यक्ती समाजाला अधिक वेळ देऊ शकतो आणि सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात प्रभावी भूमिका बजावू शकतो.”
ते पुढे म्हणाले की, नोकरीत असलेल्या व्यक्तींवर काही मर्यादा असतात, मात्र उद्योजक व्यक्ती स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो आणि समाजासाठी अधिक व्यापक कार्य करू शकतो. त्यामुळे युवकांनी संविधानिक मार्गाने उद्योग-व्यवसाय उभारून समाजसेवेत पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी चरणदास इंगोले, नाजुक अंभोरे, जिल्हाध्यक्ष अनिल गवई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊराव वानखडे, सामाजिक कार्यकर्ते सखाराम वानखडे, ग्रामीण पत्रकार संघाचे राज्य सचिव संजय वानखडे, पत्रकार रमेश समुद्रे,अजय वानखडे, पत्रकार आकाश डोंगरे, अमित इंगळे यांच्यासह सिद्धार्थ नवयुवक मंडळ व महिला मंडळाच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर सर्वांनी प्रा. कवाडे यांचे आभार मानले. त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी नांदेडकडे रवाना झाले.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

