Mahabreaking

[breaking_news]

Shri Balaji Maharaj  श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; १८ मुद्द्यांवर नियोजन

Shri Balaji Maharaj  : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, या पार्श्वभूमीवर आयोजित यात्रा समितीच्या बैठकीत वार्षिक उत्सव आणि यात्रेच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यात्रेदरम्यान भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता, वाहतूक आणि व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

Shri Balaji Maharaj 

 दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या व्यापाऱ्यांना दिलासा? यात्रेतील जागा मोफत देण्यावर चर्चा

गजानन तिडके

देऊळगाव राजा : ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या श्री बालाजी महाराज यात्रा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, या पार्श्वभूमीवर आयोजित यात्रा समितीच्या बैठकीत वार्षिक उत्सव आणि यात्रेच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यात्रेदरम्यान भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह कायदा व सुव्यवस्था, स्वच्छता, वाहतूक आणि व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

add

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे होते. श्री बालाजी संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी प्रास्ताविकात उत्सवाच्या कालावधीची तसेच आतापर्यंत करण्यात आलेल्या पूर्वतयारीची माहिती दिली.

दुष्काळी परिस्थितीचा विचार करून व्यावसायिक, शेतकरी आणि यात्रेकरूंना दिलासा देण्यासाठी श्री बालाजी संस्थान व जागावाटप समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये सर्वांसाठी अत्यल्प दरात भोजनाची सुविधा, गोशाळा, गाढव बाजारातील गाढवांसाठी चारा वाटप, यात्रेकरूंसाठी पाणपोई तसेच बसस्थानक आणि वाहनतळावरून मंदिरापर्यंत जाण्यासाठी अत्यल्प दरात इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे.

बैठकीत दरवर्षीप्रमाणे एकूण १८ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून आवश्यक ठराव करण्यात आले. यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष आणि यात्रा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याबाबत चर्चा झाली. तसेच यात्रा परिसरातील अतिक्रमणे हटविण्याच्या दृष्टीने संबंधितांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

यात्रेतील व्यापाऱ्यांना गॅस सिलिंडरचा पुरवठा, भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था, मोफत आरोग्यसेवा, स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि पथदिवे सुरू ठेवण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त एसटी बसगाड्या उपलब्ध करून देणे, लोकनाट्य मंडळांना परवानगी देणे आणि व्यावसायिकांना दररोज रात्री १२ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्याबाबत विचारविनिमय झाला. उत्सवाच्या दिवशी सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.

दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी यात्रेतील जागांचे मोफत वाटप करण्याच्या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा झाली. या सवलतीचा लाभ केवळ व्यावसायिकांपुरता मर्यादित न राहता त्याचा फायदा यात्रेकरूंनाही मिळावा, यासाठी सर्वानुमते चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.

या बैठकीला श्री सतीश कायंदे, नगराध्यक्षा माधुरी शिंपणे, सर्व नगरसेवक, उपविभागीय पोलीस अधिकारी ठोसरे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी, मुख्याधिकारी अरुण मोकळ, विद्युत व परिवहन विभागाचे अधिकारी, यात्रा समितीचे सदस्य तसेच पत्रकार उपस्थित होते.

यात्रा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, संस्थान आणि यात्रा समितीने विविध सुविधांचे नियोजन सुरू केले असून, यंदाचा उत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top