Prantik Tailik Mahasabha : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही केवळ संघटनात्मक पातळीवर कार्य करणारी संस्था नसून सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी संघटना आहे, असे प्रतिपादन महासभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी केले. ते छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या महाराष्ट्र कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.

तैलीक समाजाच्या प्रश्नांसाठी संघटित लढ्याची गरज; छत्रपती संभाजीनगर बैठकीत विविध ठरावांवर चर्चा
अशोक इंगळे
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ही केवळ संघटनात्मक पातळीवर कार्य करणारी संस्था नसून सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी संघटना आहे, असे प्रतिपादन महासभेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी केले. ते छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या महाराष्ट्र कार्यकारिणी बैठकीत बोलत होते.
यावेळी बोलताना रामदास तडस यांनी राज्यात, विशेषतः विदर्भात तेली समाजाची संख्या मोठी असली तरी समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक सक्रियपणे पुढे येण्याची गरज असल्याचे नमूद केले. समाजातील अडीअडचणी, शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय प्रश्न सोडविण्यासाठी संघटित पद्धतीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तेली समाज हा ओबीसी प्रवर्गातील असल्याने, ओबीसी जातीनिहाय जनगणना करताना संबंधित जातीचा स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा, अशी महत्त्वाची मागणीही त्यांनी यावेळी केली. यामुळे समाजातील ओबीसींची वस्तुस्थिती, संख्या आणि त्यांच्या प्रश्नांचे स्वरूप अधिक स्पष्टपणे समोर येईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच प्रांतिक तैलिक महासभेच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळे, सामाजिक मेळावे आणि समाज एकत्रीकरणाचे उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले. अशा उपक्रमांमुळे समाजात एकजूट वाढेल आणि संघटनात्मक बळ अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीत विविध सामाजिक, संघटनात्मक आणि शासकीय प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रारंभी महासभेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी प्रस्ताव सादर करणे, आरक्षणातून एकदा लाभ घेतल्यानंतर पुढील संधी ओपन कॅटेगरीमधून मिळावी, यासाठी शासनासोबत चर्चा करणे, तसेच मुंबई आणि नवी मुंबई येथील भूखंडांबाबत शासनाशी संवाद साधून मार्ग मोकळा करणे अशा महत्त्वाच्या विषयांवर विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीस महासभेचे सचिव डॉ. भुषण कर्डिले, प्रदेश उपाध्यक्ष गजानन शेलार, उपाध्यक्ष अशोक व्यवहारे, संजय विभुते, कोषाध्यक्ष बळवंत मोरधडे, सहसचिव सुनील चौधरी, तसेच जयेश बागडे, निलेश सोनूने, निलेश खैरनार, रंजन बिरारी, अरुण क्षिरसागर, सचिन शिंदे, पश्चिम विदर्भ सचिव रमेश आकोटकर आणि बुलढाणा जिल्हाध्यक्ष सुभाष देव्हडे, महिला जिल्हाध्यक्षा सुषमा राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये कार्याध्यक्ष ज्ञानदेव क्षिरसागर, जिल्हा सचिव नंदकिशोर गायकवाड, सहसचिव विजय सोनूने, दत्तात्रय करवंदे, गोपाल पाखरे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत संघटनेच्या भविष्यातील कामकाजाचा आराखडा, समाजप्रबोधन, शैक्षणिक मदत, विवाह सोहळे, सामाजिक संवाद आणि शासकीय पातळीवरील पाठपुरावा या मुद्द्यांवरही चर्चा झाली.
समाजातील प्रश्न केवळ मांडून न थांबता त्यावर तोडगा काढण्यासाठी संघटनेने अधिक परिणामकारक आणि समन्वयपूर्ण काम करण्याची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सामाजिक बांधिलकी, संघटनात्मक बळकटी आणि समाजहिताच्या विविध प्रश्नांसाठी भविष्यात अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

