Police raid: आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, निवडणुका शांततेत व निर्भयतेने पार पडाव्यात यासाठी बोरगाव मंजू पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत पोलिसांनी अवैध दारूविरोधात धाडसत्र राबवत मोठी कारवाई केली.गुरुवारी सायंकाळी रामगाव ते धोतर्डी परिसरातील अवैध देशी दारू व हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे टाकून तीन जणांना ताब्यात घेत विविध गुन्हे दाखल करण्यात आले.

ऑपरेशन ‘प्रहार’ अंतर्गत बोरगाव मंजू पोलिसांची मोठी कारवाई
संजय तायडे
बोरगाव मंजू : आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, निवडणुका शांततेत व निर्भयतेने पार पडाव्यात यासाठी बोरगाव मंजू पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत पोलिसांनी अवैध दारूविरोधात धाडसत्र राबवत मोठी कारवाई केली.गुरुवारी सायंकाळी रामगाव ते धोतर्डी परिसरातील अवैध देशी दारू व हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे टाकून तीन जणांना ताब्यात घेत विविध गुन्हे दाखल करण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगाव व धोतर्डी परिसरात अवैधरित्या देशी दारू व हातभट्टी चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार अनिल गोपाळ, पो.उपनिरीक्षक मनोज उघडे, रविंद्र धुळे आणि पथकातील इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. छाप्यात विजय सोमेश्वर इंगळे (रा. रामगाव) याच्याकडून विनापरवाना देशी दारूच्या 144 बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मालाची किंमत 11,528 रुपये असून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, धोतर्डी गावातील हातभट्टीवर टाकलेल्या छाप्यात आकाश विलास बिल्लेवार हा आरोपी ताब्यात घेतला. त्याच्याकडून गावठी हातभट्टी दारू – 20 लिटर, सडवा मोहफुले – 150 लिटर (10 टिन पिंपे) किंमत 15,000 रुपये, दोन कॅनमधील देशी दारू – 20 लिटर किंमत 4,000 रुपये, असा एकूण 19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. याशिवाय कौलखेड फाटा येथे मोहन ज्ञानेश्वर घुसे हा अवैधरित्या देशी दारू विकताना आढळला. त्याच्याकडून 58 देशी दारूच्या बाटल्या (किंमत 1,450 रुपये) जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन उडान’ अंतर्गत पोलीस पथकाने केली. पथकात ठाणेदार अनिल गोपाळ, पो.उपनिरीक्षक रविंद्र धुळे, मनोज उघडे, पो.हेडकॉन्स्टेबल सतीश हाडोळे, उमेश पुरी, संजय भारसाकडे, तसेच सुदीप राऊत, अक्षय देशमुख, शेखर कोद्रे, अजिंक्य हळदे व महिला पोलीस सरोज देशमुख यांचा सहभाग होता. पोलिसांनी सर्व प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

