DJ noise: जिल्ह्यात धार्मिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक मिरवणुकांमध्ये तासंतास वाजणाऱ्या डीजेच्या प्रचंड आवाजामुळे बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी बुलढाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

‘चार-चार तास डीजेच्या आवाजात पोलिसांची ड्युटी’; माजी राज्यमंत्री सुबोध सावजी आक्रमक
डोणगाव : जिल्ह्यात धार्मिक, ऐतिहासिक तसेच सामाजिक मिरवणुकांमध्ये तासंतास वाजणाऱ्या डीजेच्या प्रचंड आवाजामुळे बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी बुलढाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मिरवणुकांदरम्यान सलग चार-चार तास डीजेचा कर्णकर्कश आवाज सुरू असतो. या प्रचंड आवाजाच्या वातावरणात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावावे लागते. सततच्या गोंगाटामुळे पोलिसांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस कर्मचाऱ्यांनी खाजगीत आपल्याकडे व्यक्त केल्याचे सुबोध सावजी यांनी पत्रात नमूद केले आहे.
पोलीस दल हे शिस्त व नियमांच्या चौकटीत कार्यरत असल्याने अनेक कर्मचारी स्वतःहून आपल्या आरोग्याशी संबंधित समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडण्यास संकोच करतात. त्यामुळे त्यांच्या या समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही सावजी यांनी पत्रात म्हटले आहे.
मिरवणुकांमध्ये वाजविण्यात येणाऱ्या डीजेच्या मोठ्या आवाजामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास लक्षात घेता, प्रशासनाने या संपूर्ण बाबीचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. तसेच ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडे केली आहे.
मिरवणुकांमध्ये नागरिकांच्या उत्साहासोबतच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या आरोग्याचाही विचार होणे आवश्यक असून, प्रशासनाने या प्रश्नावर गांभीर्याने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

