Plant trees first : सतत वाढत असलेली उष्णता, विक्रमी तापमान आणि झपाट्याने कमी होत चाललेली हिरवाई यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामानातील बदल आणि निसर्गातील असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणासाठी विविध स्तरांवर जनजागृती मोहिमा राबविल्या जात असून, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे दिला जात आहे.

वाढत्या तापमानाने चिंता वाढली; वृक्षारोपणासाठी सामाजिक जनजागृतीला वेग
जाकीर अहमद
बाळापूर : सतत वाढत असलेली उष्णता, विक्रमी तापमान आणि झपाट्याने कमी होत चाललेली हिरवाई यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामानातील बदल आणि निसर्गातील असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षणासाठी विविध स्तरांवर जनजागृती मोहिमा राबविल्या जात असून, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे दिला जात आहे.
सामाजिक माध्यमे, विविध संस्था आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून “घरासमोर चार झाडे लावा, सावली नक्की मिळेल” असा भावनिक संदेश देत नागरिकांना झाडे लावण्याचे आणि ती जगवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आज झाडे लावली नाहीत, तर भविष्यात वाढणारे तापमान अधिक गंभीर संकट निर्माण करू शकते, अशी भीतीही व्यक्त होत आहे. सध्या ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेले तापमान भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पर्यावरणप्रेमींच्या मते, बेसुमार वृक्षतोड, वाढते शहरीकरण आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून, त्याचा परिणाम उष्णता, उष्माघात, पाणीटंचाई आणि प्रदूषित हवेच्या स्वरूपात नागरिकांना भोगावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येकाने घराजवळ, शेतात, रस्त्यांच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक वृक्षारोपण करणे काळाची गरज बनली आहे.
प्राध्यापक जफर हुसेन शेख यांनी सांगितले की, “फक्त सरकारच्या भरवशावर पर्यावरण वाचणार नाही. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखून पुढे आले पाहिजे. युवकांनी वृक्षारोपण मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे.”
तर आसिफ शाह यांनी “झाडे लावा, झाडे जगवा” हा केवळ नारा नसून पुढील पिढ्यांच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठीचा संकल्प असल्याचे सांगितले. रोपे लावण्याबरोबरच त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन व्यापक वृक्षारोपण मोहिमा राबविल्यास भविष्यातील पिढ्यांना शुद्ध हवा, सावली आणि सुरक्षित पर्यावरण मिळू शकते. नागरिकांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

