Mahabreaking

[breaking_news]

Smart-Metered Center :पिंपळगाव राजा-२ ठरले विदर्भातील पहिले १००% स्मार्ट मीटरयुक्त केंद्र; ग्राहकांना दिवसा वीजदरात सवलत

Smart-Metered Center :महावितरणच्या खामगाव विभागांतर्गत येणारे पिंपळगाव राजा-२ हे शाखा कार्यालय विदर्भातील पहिले १०० टक्के स्मार्ट (टाइम ऑफ डे – TOD) मीटर बसविणारे केंद्र ठरले आहे. मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते शेवटचे स्मार्ट मीटर बसवून या योजनेची शंभरी पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली.

Smart-Metered Center

 बुलढाणा : महावितरणच्या खामगाव विभागांतर्गत येणारे पिंपळगाव राजा-२ हे शाखा कार्यालय विदर्भातील पहिले १०० टक्के स्मार्ट (टाइम ऑफ डे – TOD) मीटर बसविणारे केंद्र ठरले आहे. मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते शेवटचे स्मार्ट मीटर बसवून या योजनेची शंभरी पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आली. स्मार्ट मोबाईल व स्मार्ट टीव्हीप्रमाणेच स्मार्ट मीटर ही काळाची गरज असून, यामुळे वीजसेवेत पारदर्शकता आणि अचूकता वाढणार असल्याचे मुख्य अभियंता नाईक यांनी सांगितले.

स्मार्ट मीटरमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे मीटर वाचन स्वयंचलितपणे होत असल्याने सरासरी बिल किंवा वाचन न झाल्याच्या तक्रारी आता संपुष्टात येणार आहेत. ग्राहकांना त्यांच्या वीज वापराची माहिती दर तासाला मोबाईलवर उपलब्ध होत असल्याने वापरावर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे झाले आहे.

महावितरणकडून घरगुती ग्राहकांना स्मार्ट (TOD) मीटरद्वारे दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निश्चित केलेल्या दरांनुसार ही सवलत १ जुलै २०२५ पासून लागू आहे. या मीटरमुळे दिवसा व रात्रीच्या वीज वापराची स्वतंत्र नोंद होत असल्याने सवलतीचा लाभ थेट ग्राहकांना मिळतो.

पिंपळगाव राजा-२ वितरण केंद्रात एकूण ४,२६३ ग्राहक असून, घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर सर्व श्रेणीतील ग्राहकांकडे स्मार्ट TOD मीटर बसविण्यात आले आहेत. ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू झालेली ही मोहीम अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण झाली. या कालावधीत फिडरच्या इनपुटमध्ये ३३ टक्क्यांनी घट झाली असून बिलिंग कार्यक्षमता ८४.४५ टक्क्यांवरून ९५.४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. विशेष म्हणजे, वीज बिलांशी संबंधित तक्रारी शून्यावर आल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता विरेंद्र जसमातिया, उपकार्यकारी अभियंता हिराळकर, कनिष्ठ अभियंता राजपूत तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत ग्राहकांच्या शंका दूर करत स्मार्ट मीटरचे फायदे पटवून दिले. त्यांच्या या कार्याचे मुख्य अभियंता नाईक यांनी कौतुक करत अभिनंदन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top