Mahabreaking

[breaking_news]

gulal: बुलढाणा जिल्ह्यात रासायनिक गुलालावर कायमस्वरूपी बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

gulal: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच पर्यावरणपूरक व सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा व्हावा, यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाढते प्रदूषण आणि रासायनिक गुलालामुळे मानवी आरोग्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेऊन संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात रासायनिक गुलालाचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वापरावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.

gulal

रासायनिक गुलाल विकाल तर कारवाई! बुलढाणा जिल्ह्यात उत्पादन, विक्री व वापरावर बंदी

बुलढाणा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच पर्यावरणपूरक व सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा व्हावा, यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाढते प्रदूषण आणि रासायनिक गुलालामुळे मानवी आरोग्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम लक्षात घेऊन संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात रासायनिक गुलालाचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वापरावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, १९८६ मधील कलम ५ अन्वये आदेश जारी केले आहेत.

दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत श्री गणेशोत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर गुलालाचा वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर रासायनिक गुलालामुळे होणारे पर्यावरणीय तसेच आरोग्यविषयक धोके लक्षात घेऊन निर्बंध लागू करण्याची आवश्यकता असल्याचे पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

घातक रसायनांमुळे आरोग्याला धोका

रासायनिक गुलालाच्या निर्मितीत लेड ऑक्साईड, कॉपर सल्फेट, क्रोमियम आयोडाइड, ॲल्युमिनियम ब्रोमाईड यांसारख्या घातक रसायनांचा वापर केला जात असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. अशा रसायनांच्या संपर्कामुळे डोळ्यांची ॲलर्जी, त्वचेची ॲलर्जी, श्वसनविकार, ब्रॉन्कियल अस्थमा तसेच इतर गंभीर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याचा धोका असतो. रासायनिक गुलाल जलस्रोतांमध्ये मिसळल्यास जलप्रदूषणासोबतच माती व हवेचे प्रदूषण होण्याची शक्यता असते.

उत्पादन, विक्री, साठवणुकीलाही मनाई

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात रासायनिक गुलालाचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वापर करण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदारांना रासायनिक गुलालाची विक्री अथवा साठवणूक करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.

रासायनिक गुलालाऐवजी नैसर्गिक व जैविक घटकांपासून तयार करण्यात आलेल्या सुरक्षित हर्बल व नैसर्गिक गुलालाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा आस्थापनांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलीस प्रशासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. यासाठी स्वतंत्र पथके तयार करून आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top