Paramhansa Shri Tejasvi Maharajs: श्री क्षेत्र वरोडी येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या परमहंस श्री तेजस्वी महाराज वारकरी पायी दिंडीचे मंगळवार, ७ जुलै रोजी साखरखेर्डा येथे उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. दिंडीचे साखरखेर्डा नगरीत फटाक्यांच्या आतिषबाजीत, हरिनामाच्या गजरात आणि भाविकांच्या उत्स्फूर्त स्वागताने भव्य स्वागत करण्यात आले.

‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात तेजस्वी महाराजांची दिंडी साखरखेर्ड्यात दाखल; भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
साखरखेर्डा : श्री क्षेत्र वरोडी येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या परमहंस श्री तेजस्वी महाराज वारकरी पायी दिंडीचे मंगळवार, ७ जुलै रोजी साखरखेर्डा येथे उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. दिंडीचे साखरखेर्डा नगरीत फटाक्यांच्या आतिषबाजीत, हरिनामाच्या गजरात आणि भाविकांच्या उत्स्फूर्त स्वागताने भव्य स्वागत करण्यात आले.

तेजस्वी महाराज संस्थानच्या वतीने ह.भ.प. प्रकाश महाराज मगर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी श्री क्षेत्र वरोडी येथून शेकडो वारकऱ्यांसह पायी दिंडी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना होते. यंदा या दिंडीचे पाचवे वर्ष असून, मंगळवारी सकाळी सुमारे ९ वाजता वरोडी येथील तेजस्वी महाराज संस्थानमधून दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. टाळ-मृदंगाच्या निनादात, हरिनामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात निघालेली ही दिंडी दुपारी सुमारे १ वाजता साखरखेर्डा येथे दाखल झाली.
दिंडीचे आगमन होताच साखरखेर्डा नगरीत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. देऊळगाव माळी रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज टी-पॉइंटवर दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच ज्योती अमित जाधव, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, श्रीधर काळे, किरण कोतवाल, शिवा पाझडे, अशोक इंगळे, डी. एन. पांचाळ, रामदाससिंग राजपूत, आशिष पोंधे, तेजराव ठोसरे आदींसह ग्रामस्थांनी भावपूर्ण स्वागत केले.
दिंडीतील वारकऱ्यांसाठी सहकार विद्या मंदिर आणि पैनगंगा सहकारी सुतगिरणी परिसरातील भाविकांनी चहा, पाणी आणि बिस्किटांचे वाटप करून सेवा अर्पण केली. या पायदळ दिंडीत संस्थानचे विश्वस्त विजय जाधव तसेच युवा सेना नेते योगेश पंजाबराव जाधव हेही सहभागी झाले आहेत.
यावेळी साखरखेर्डा येथील होळकर भजनी मंडळ, संत सावता माळी भजनी मंडळ यांच्यासह महिला, पुरुष आणि बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखीचे दर्शन घेतले आणि दिंडीतही सहभागी झाले. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात आणि हरिनामाच्या गजरात परिसर पूर्णतः भक्तिमय झाला होता.
ही वारकरी दिंडी दर कोस मुक्काम करीत १८ दिवसांच्या प्रवासानंतर शुक्रवार, २४ जुलै रोजी आषाढी शुद्ध दशमीला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. दिंडीत स्त्री-पुरुष वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, मुक्कामाच्या ठिकाणी दररोज सायंकाळी हरिपाठ व आरती, रात्री हरिकीर्तन आणि सकाळी काकडा भजन असे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. वारकऱ्यांच्या भोजनाची तसेच आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक साधनसामग्रीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.साखरखेर्डा ग्रामस्थांनी दिंडीसाठी भोजनाची व्यवस्था केली होती. त्यानंतर दिंडीने शेंदुर्जनकडे प्रस्थान केले असून, आजचा मुक्काम शेंदुर्जन येथे आहे.

