man brandishes sharp knife : शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात हातात धारदार चाकू घेऊन आरडाओरडा करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीला पातूर पोलिसांनी तत्पर कारवाई करत ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्टच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या बसस्थानक परिसरात चाकूधारीचा धिंगाणा; आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल
निशांत गवई
पातूर : शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात हातात धारदार चाकू घेऊन आरडाओरडा करत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीला पातूर पोलिसांनी तत्पर कारवाई करत ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्टच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास जुन्या बसस्थानक परिसरात एक व्यक्ती हातात धारदार चाकू घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती नाईट ऑफिसर सहाय्यक फौजदार (एएसआय) मानकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
तेथे एक व्यक्ती हातात धारदार चाकू घेऊन आरडाओरडा करत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपले नाव एजाज खान मीरबाज खान (वय ४६, रा. इंदिरानगर, रामवाडी, अशोकनगर, अकोट, जि. अकोला) असे सांगितले. आरोपीच्या ताब्यातून स्टील धातूचा, एका बाजूला धार असलेला, मुठीसह ३३ सेंटीमीटर लांबीचा व २० सेंटीमीटर पात्याचा धारदार चाकू पंचासमक्ष जप्त करण्यात आला. याबाबत घटनास्थळी जप्ती पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी सहाय्यक फौजदार दत्तात्रय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४४/२०२६ नोंदविण्यात आला असून आरोपीविरुद्ध आर्म्स ॲक्टच्या कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची नोंद एएसआय मानकर यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय चव्हाण करीत आहेत. पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे बाजारपेठेतील संभाव्य अनुचित प्रकार टळल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

