Samruddha Panchayat Campaign: महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान’ अंतर्गत मेहकर तालुक्यातील पांगरखेड ग्रामपंचायतीचे तालुकास्तरीय मूल्यमापन नुकतेच उत्साहात पार पडले. नागपूर जिल्हा परिषद मूल्यमापन समितीने ११ मे २०२६ रोजी गावाला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. ग्रामपंचायतीने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसह प्रशासकीय शिस्तीची दखल घेत समितीने पांगरखेडच्या कार्याचे कौतुक केले.

लोकसहभागातून विकासाची वाटचाल; पांगरखेड ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय दखल
डोणगाव : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान’ अंतर्गत मेहकर तालुक्यातील पांगरखेड ग्रामपंचायतीचे तालुकास्तरीय मूल्यमापन नुकतेच उत्साहात पार पडले. नागपूर जिल्हा परिषद मूल्यमापन समितीने ११ मे २०२६ रोजी गावाला भेट देऊन विविध विकासकामांची पाहणी केली. ग्रामपंचायतीने राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांसह प्रशासकीय शिस्तीची दखल घेत समितीने पांगरखेडच्या कार्याचे कौतुक केले.
या मूल्यमापन प्रक्रियेसाठी नागपूर जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी संदीप गोडशलवार, कृषी अधिकारी रवी राठोड, विस्तार अधिकारी (पंचायत) जीवन देशमुख, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) मनोज काटवे तसेच तालुका व्यवस्थापक मनोज राऊत उपस्थित होते. समितीने गावातील विविध विकासकामांची तांत्रिक व भौतिक पडताळणी केली.
यावेळी मेहकर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी धीरज जाधव, विस्तार अधिकारी संदीप मेटांगळे, शिवाजी गवई, सुरेश मावळ तसेच ग्रामपंचायत प्रशासक सुधाकर मधुकर धंदरे आणि प्रशासक समितीच्या सदस्यांनी समितीसमोर गावातील विकासकामांची सविस्तर माहिती मांडली.
समितीने केवळ कागदपत्रांची पडताळणी न करता गावात प्रत्यक्ष राबविण्यात आलेल्या योजनांची पाहणी केली. विविध स्पर्धांमध्ये गावाने यापूर्वी मिळवलेले यश तसेच अभियानांतर्गत सुरू असलेल्या उपक्रमांबाबत समितीने समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाला गावातील महिला व ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती. लोकसहभागातून गाव समृद्धीकडे कशा पद्धतीने वाटचाल करत आहे, याचे उत्तम उदाहरण पांगरखेड ग्रामपंचायतीने सादर केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. दरम्यान, ग्रामपंचायतीचे अधिकारी सागर काळे यांनी या यशाचे श्रेय ग्रामस्थ, आजी-माजी पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दिले. “सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच पांगरखेडचे नाव जिल्ह्याच्या नकाशावर अभिमानाने झळकत आहे,” असे त्यांनी सांगितले.

