Panaganga Sugar Factory : बुलढाणा तालुक्यातील वरूड (धाड) येथील पैनगंगा साखर कारखाना प्रा. लि.च्या गाळप हंगाम २०२६-२७ साठी उस तोडणी व वाहतूक करार प्रक्रियेचा शुभारंभ सोमवार, दि. २५ मे रोजी कारखाना कार्यस्थळी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास कारखान्याचे विद्यमान चेअरमन अनिल गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

पंडित सावळे
मासरूळ : बुलढाणा तालुक्यातील वरूड (धाड) येथील पैनगंगा साखर कारखाना प्रा. लि.च्या गाळप हंगाम २०२६-२७ साठी उस तोडणी व वाहतूक करार प्रक्रियेचा शुभारंभ सोमवार, दि. २५ मे रोजी कारखाना कार्यस्थळी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमास कारखान्याचे विद्यमान चेअरमन अनिल गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवर व तोडणी-वाहतूक ठेकेदारांच्या हस्ते विधिवत करार पुस्तकाचे पूजन करून हंगाम २०२६-२७ साठी उस तोडणी व वाहतूक करार प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यावेळी ऊस तोडणी मुकरदम, वाहतूक ठेकेदार आणि शेतकरी बांधवांचे कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी चेअरमन अनिल गुंजाळ यांनी मागील गाळप हंगामातील ऊसदर, ऊस गाळप, साखर उत्पादन, शेतकरी देयके तसेच तोडणी-वाहतूक नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले की, “पेनगंगा कारखान्याने मागील हंगामात शेतकऱ्यांना विदर्भातील सर्वाधिक एकरकमी ३,१२१ रुपये ऊसदर अदा करून त्यांच्या कष्टाचा मोबदला वेळेत दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कारखान्याबद्दल विश्वास निर्माण झाला असून ऊस शेतीकडे शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून पाहिले जाऊ लागले आहे.”
कारखान्याने आजअखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे ५६ कोटी रुपयांची ऊसबिले वर्ग केली असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच तोडणी व वाहतूक ठेकेदारांच्या खात्यावर जवळपास १५ कोटी रुपयांची बिले वर्ग करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे पेनगंगा कारखाना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे परिसरातील शेतकरी व स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले. परिसरातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस लागवड करून कारखान्यास ऊस पुरवठा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
येत्या २०२६-२७ गाळप हंगामासाठी अधिकाधिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट समोर ठेवून कारखान्याची पूर्वतयारी, यंत्रसामग्री दुरुस्ती, नियोजन व विविध विभागांच्या कामांना सुरुवात करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर (प्रोसेस) विजय खरात यांनी दिली.
तसेच चालू हंगामातील ऊस नोंदणी, नव्याने सुरू असलेली ऊस लागवड, ऊस विकासाचे विविध उपक्रम तसेच पुढील हंगामासाठी सुरू असलेले तोडणी-वाहतूक करार व नियोजनाबाबत शेतकी अधिकारी प्रमोद म्हस्के यांनी माहिती दिली.
चेअरमन अनिल गुंजाळ यांनी अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, मुकरदम व तोडणी-वाहतूक ठेकेदार यांच्या समन्वयातून यंदाचा गाळप हंगाम उच्चांकी गाळप करून यशस्वी करण्याचे आवाहन केले. यावेळी मागील हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचारी, ऊस तोडणी मुकरदम व वाहतूक ठेकेदारांचा कारखान्याच्या वतीने गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लेखा विभाग प्रमुख निलेश रणवारे यांनी केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी सस्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी परिसरातील शेतकरी, कर्मचारी, ऊस तोडणी मुकरदम व वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

