Officers are being groomed : ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची संधी उपलब्ध करून देत त्यांना शासकीय सेवेकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासीका व ग्रंथालय हा उपक्रम आज ग्रामीण भागातील अनेक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना प्रेरणास्थान ठरत आहे. सामाजिक कार्यकर्ते देवानंद मोहोड, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे, पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे,या त्रिमूर्ती मित्रांनी दोन दशकांपूर्वी सुरू केलेल्या या निःशुल्क उपक्रमातून आज २२८ पेक्षा जास्त शेकडो युवक-युवती विविध शासकीय सेवांमध्ये कार्यरत आहेत.

बोरगाव मंजूत दोन दशकांची ज्ञानसेवा; त्रिमूर्ती मित्रांची संकल्पना ; अभ्यासिकेतून शेकडो युवकांना शासकीय सेवेत संधी
संजय तायडे
बोरगाव मंजू : ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची संधी उपलब्ध करून देत त्यांना शासकीय सेवेकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासीका व ग्रंथालय हा उपक्रम आज ग्रामीण भागातील अनेक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना
प्रेरणास्थान ठरत आहे. सामाजिक कार्यकर्ते देवानंद मोहोड, उपजिल्हाधिकारी राहुल तायडे, पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे,या त्रिमूर्ती मित्रांनी दोन दशकांपूर्वी सुरू केलेल्या या निःशुल्क उपक्रमातून आज २२८ पेक्षा जास्त शेकडो युवक-युवती विविध शासकीय सेवांमध्ये कार्यरत आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके आणि मार्गदर्शन मिळणे कठीण होते. ही गरज ओळखून त्रिमूर्ती नी स्वतःच्या पुढाकारातून अभ्यासीका सुरू केली. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून देणे, अभ्यासासाठी शांत वातावरण निर्माण करणे आणि वेळोवेळी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करणे, अशी विविध सुविधा येथे निःशुल्क उपलब्ध करून देण्यात आली.
अभ्यासीकेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी एमपीएससी, पोलीस भरती, कोर्ट ,महसूल, ग्रामविकास तसेच इतर शासकीय सेवांच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून यश संपादन केले आहे. नोकरीत रुजू झालेल्या अनेक माजी विद्यार्थ्यांनीही नव्या विद्यार्थ्यांना पुस्तके, मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
डॉ.बाबा साहेब आंबेडकर अभ्यासिका अध्यक्ष देवानंद मोहोड यांच्या सह निवासी उपजिल्हाधिकारी राहुल तायडे आणि पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचेही अमूल्य सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्याने अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असंख्य संदर्भग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले असून, विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन मिळावे यासाठी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तज्ज्ञांचे मार्गदर्शनही आयोजित केले जाते.
पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे म्हणाले, “लहान रोपट्याचा विशाल वृक्ष व्हावा, या अपेक्षेने अभ्यासिकेतील विद्यार्थी वर्ग-१ अधिकारी व्हावेत, हा ध्यास आम्ही घेतला आहे. ‘प्रथम राष्ट्र’ ही विचारधारा विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून सातत्याने सुरू आहे.”
निवासी उपजिल्हाधिकारी राहुल तायडे यांनी सांगितले की, “दोन दशकांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी दिशा मिळाली आहे. या अभ्यासिकेतून घडलेले अधिकारीच आज नव्या पिढीला प्रेरणा देत आहेत. हीच या उपक्रमाची सर्वात मोठी ताकद आहे.”
सामाजिक कार्यकर्ते तथा अभ्यासिका अध्यक्ष देवानंद मोहोड यांनी सांगितले की, “ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची अद्ययावत माहिती, दर्जेदार पुस्तके आणि योग्य मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या यशातूनच आमच्या कार्याचे समाधान मिळते.”
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरलेल्या या निःशुल्क अभ्यासिकेमुळे अनेक युवक-युवतींना उज्ज्वल भविष्याची दिशा मिळत असून, तीन मित्रांनी सामाजिक बांधिलकीतून उभा राहिलेला हा उपक्रम आज प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

