No network : गेल्या तीन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात दूरसंचार सेवेत मोठा बिघाड झाल्याने रिलायन्स जिओच्या मोबाईल कॉल्स व इंटरनेट सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. नेटवर्क गायब झाल्यामुळे हजारो ग्राहकांचा परस्पर संपर्क ठप्प झाला असून दैनंदिन व्यवहारांवरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील परिस्थिती अधिक बिकट असल्याचे चित्र आहे.

लोणार : गेल्या तीन दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात दूरसंचार सेवेत मोठा बिघाड झाल्याने रिलायन्स जिओच्या मोबाईल कॉल्स व इंटरनेट सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. नेटवर्क गायब झाल्यामुळे हजारो ग्राहकांचा परस्पर संपर्क ठप्प झाला असून दैनंदिन व्यवहारांवरही त्याचा गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील परिस्थिती अधिक बिकट असल्याचे चित्र आहे.
लोणार शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये ‘नो नेटवर्क’ किंवा ‘इमर्जन्सी कॉल्स ओन्ली’ असा संदेश मोबाईल स्क्रीनवर दिसत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी तसेच ऑनलाईन व्यवहारांवर अवलंबून असलेले व्यावसायिक यांचे कामकाज अडथळ्यात आले आहे. यूपीआय व्यवहार, ऑनलाईन बँकिंग, शासकीय संकेतस्थळांवरील कामे आणि शैक्षणिक उपक्रम ठप्प झाल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
अनेक नागरिकांनी ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र नेटवर्क उपलब्ध नसल्याने तक्रार नोंदविणेही शक्य झाले नाही. काही ठिकाणी इंटरनेट अधूनमधून सुरू होत असले तरी कॉल सेवा पूर्णपणे बंद असल्याची तक्रार आहे. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता न आल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर नगरपालिकेतील शिवसेना-भाजप महायुतीचे गटनेते तथा शिवसेना नगरसेवक मयुर गोलेच्छा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कंपनी प्रशासनाने तात्काळ तांत्रिक अडचणी दूर करून सेवा सुरळीत सुरू करावी, अशी मागणी केली. “दूरसंचार सेवा ही अत्यावश्यक सेवांपैकी एक आहे. सलग तीन दिवस सेवा बंद राहणे ही गंभीर बाब असून ग्राहकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे,” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, संबंधित कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप मिळाले नसून नेमका बिघाड कशामुळे झाला याबाबत संभ्रम कायम आहे. नेटवर्क सेवा कधी पूर्ववत होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून प्रशासनानेही या प्रकरणात लक्ष घालून ग्राहकांना लवकरात लवकर दिलासा द्यावा, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

