Nine-Day Hunger Strike Successful : बीबी,किनगाव जट्टू आणि हिवरा खंड येथील जल जीवन मिशनच्या कामातील कथित अनियमितता तसेच बीबी गावातील दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर तरुण सामाजिक कार्यकर्ते राहुल इंगळे आणि विनोद इंगळे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सांगता झाली. जल जीवन मिशन चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.

दूषित पाणीपुरवठा आणि कथित भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला यश; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित
बीबी : बीबी,किनगाव जट्टू आणि हिवरा खंड येथील जल जीवन मिशनच्या कामातील कथित अनियमितता तसेच बीबी गावातील दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर तरुण सामाजिक कार्यकर्ते राहुल इंगळे आणि विनोद इंगळे यांनी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाची अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सांगता झाली. जल जीवन मिशन चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.
या तीन गावांमधील जल जीवन मिशनची कामे विहित मूल्यमापन व अटींनुसार झाली नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. तसेच बीबी गावातील पिण्याच्या पाण्याच्या नळांना घाण, दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार त्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी संबंधित विभागाकडे केली होती. या संदर्भात ग्राम महसूल अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, उपविभागीय अभियंता, मुख्य कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे वेळोवेळी लेखी व तोंडी पाठपुरावा करण्यात आला होता.
मात्र प्रश्नाची तत्काळ दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत कार्यकर्ते २५ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. उपोषणाला विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. यामध्ये अॅड. सुमित सरदार, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय मोरे, विजयराज शिंदे आणि राजेंद्र शिंगणे यांचा समावेश होता. काही मान्यवरांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरूनही चर्चा केली. उपोषणादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. अखेर उपोषणाच्या नवव्या दिवशी प्रशासनाने सर्व मागण्यांवर कार्यवाही करण्याचे तोंडी व लेखी आश्वासन दिले. तसेच चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त केल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले. मुख्य कार्यकारी अभियंता कार्यालयीन कामकाजासाठी अमरावती येथे गेले असल्याने त्यांच्या वतीने लोणारचे उपविभागीय अभियंता श्री मोहिते यांच्या हस्ते आंब्याचा रस देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी बीबीचे माजी सरपंच बबन बनकर, लोणार पंचायत समितीच्या माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष वर्षाताई इंगळे, सुनील इंगळे, शेख जाकीर, ए. जे. इंगळे, कनिष्ठ अभियंता मापारी, भारत साळवे, सचिन निकाळजे, शेख अनिस, हिवाळे आणि सुधाकर डोंगरदिवे यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.

