One Killed in Shooting : बाळापूर तालुक्यातील निंबी मालोकार येथे रविवारी गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेत अमोल गजानन मालोकर यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून, गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संशयित आरोपी फरार; बाळापूर तालुक्यात गोळीबाराने खळबळ
बाळापूर : बाळापूर तालुक्यातील निंबी मालोकार येथे रविवारी गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेत अमोल गजानन मालोकर यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून, गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.
बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ), बाळापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) पथके तसेच अकोला जुना शहर पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
फॉरेन्सिक पथकाकडून तपास
गोळीबाराच्या घटनेनंतर घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाकडून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून महत्त्वाचे पुरावे व आवश्यक नमुने संकलित करण्याचे काम सुरू आहे. गोळीबार कोणत्या कारणातून झाला, घटनेच्या वेळी नेमके काय घडले आणि त्यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस विविध अंगांनी करीत आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर निंबी मालोकार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
फरार संशयिताचा शोध
गोळीबाराच्या घटनेनंतर संशयित आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके सक्रिय करण्यात आली आहेत. परिसरातील संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासासह इतर बाबींचाही आधार घेतला जात असल्याची माहिती आहे.
गोळीबारासाठी कोणते शस्त्र वापरण्यात आले, घटनेमागील नेमके कारण काय आणि संशयित आरोपीची भूमिका काय आहे, याबाबतचा खुलासा पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे. या घटनेमुळे निंबी मालोकारसह बाळापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

