Mahabreaking

[breaking_news]

Nilesh Kharats :निलेश खरातच्या गुणवत्तेने शिंदीचे नाव सातासमुद्रापार; न्यूझीलंड एअरमध्ये मिळवली नोकरी

Nilesh Kharats : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या छोट्याशा गावातील युवक निलेश ऊर्फ सोनू खरात याने आपल्या गुणवत्ता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. जगातील नामांकित विमान कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर आता त्याची न्यूझीलंड एअरमध्ये निवड झाली असून, त्याच्या या यशामुळे शिंदी गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.

  Nilesh Kharats

  ग्रामीण भागातून आकाशभरारी; शिंदीच्या निलेश खरातची न्यूझीलंड एअरमध्ये निवड

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी या छोट्याशा गावातील युवक निलेश ऊर्फ सोनू खरात याने आपल्या गुणवत्ता, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. जगातील नामांकित विमान कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर आता त्याची न्यूझीलंड एअरमध्ये निवड झाली असून, त्याच्या या यशामुळे शिंदी गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.

शिंदी हे साखरखेर्डा गटातील एक छोटेसे खेडेगाव. येथील शेतकरी रमेश मारोती खरात यांनी आपल्या मुलामधील गुणवत्ता ओळखून त्याला शिक्षणासाठी बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ येथे दाखल केले. निलेशला लहानपणापासूनच विमानांविषयी विशेष आकर्षण होते. त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण बुलढाणा येथे पूर्ण केले. पुढे विमानसेवा क्षेत्रातच करिअर करण्याच्या उद्देशाने त्याने दिल्ली येथील फ्रँकलिन इन्स्टिट्यूटमधून एव्हिएशन विषयातील पदवी प्राप्त केली.

आपले स्वप्न साकार करण्यासाठी निलेशने विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. विमानसेवेत काम करण्याचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर त्याच्या जिद्द आणि चिकाटीला यश मिळाले. सन २०१४ मध्ये त्याची जगातील नामांकित कतार एअरवेजमध्ये निवड झाली.

विमानसेवेत कार्यरत असतानाही निलेशची ज्ञान मिळवण्याची भूक कायम राहिली. सन २०२४ पर्यंत कतार एअरवेजमध्ये सेवा दिल्यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी न्यूझीलंड गाठले. तेथे नामांकित आयसीएल ग्रॅज्युएट बिझनेस स्कूल (Auckland Universityशी संबंधित) येथे मास्टर ऑफ मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी त्याला प्रवेश मिळाला. आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवत त्याने ही पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर निलेशने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर न्यूझीलंड एअरमध्ये नोकरी मिळवली असून, सध्या तो तेथे विमानसेवा क्षेत्रात कार्यरत आहे. ग्रामीण भागातील एका छोट्याशा गावातून सुरू झालेला त्याचा हा सातासमुद्रापारचा खडतर प्रवास निश्चितच आजच्या ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

आपल्या या यशाचे श्रेय निलेश आपल्या आई-वडिलांसह गुरुजनांना देतो. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल शिंदीसह परिसरातील नागरिक, मित्रपरिवार आणि विविध स्तरांतून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top