Mahabreaking

[breaking_news]

  Narendra Fiske: ग्रामीण आरोग्यसेवेला आधुनिकतेची दिशा देणाऱ्या डॉ. नरेंद्र फिस्केंचा गौरव

Narendra Fiske: वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, रुग्णसेवेप्रती निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला आधुनिक उपचारांची दिशा देणाऱ्या सेवाभावी कार्याची दखल घेत जगद्गुरु श्री. पलसिद्ध महास्वामीजी मठ संस्थान, साखरखेर्डा, बुलडाणा यांच्या वतीने दिला जाणारा ‘परमपूज्य जगद्गुरु श्री. पलसिद्ध महास्वामीजी आरोग्यसेवा गौरव पुरस्कार-२०२६’ यंदा डॉ. नरेंद्र फिस्के यांना जाहीर करण्यात आला आहे.

Narendra

 कोरोनाकाळातील सेवाभावी कार्याची दखल; डॉ. नरेंद्र फिस्केंना पलसिद्ध आरोग्यसेवा गौरव पुरस्कार

साखरखेर्डा : वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, रुग्णसेवेप्रती निष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला आधुनिक उपचारांची दिशा देणाऱ्या सेवाभावी कार्याची दखल घेत जगद्गुरु श्री. पलसिद्ध महास्वामीजी मठ संस्थान, साखरखेर्डा, बुलडाणा यांच्या वतीने दिला जाणारा ‘परमपूज्य जगद्गुरु श्री. पलसिद्ध महास्वामीजी आरोग्यसेवा गौरव पुरस्कार-२०२६’ यंदा डॉ. नरेंद्र फिस्के यांना जाहीर करण्यात आला आहे.

मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख या छोट्याशा गावातून वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास सुरू करणाऱ्या डॉ. नरेंद्र फिस्के यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ग्रामीण भागात आरोग्यसेवेची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गोविंदा फिस्के यांचे ते सुपुत्र असून, गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस व एमडी हे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये IDCCM (Intensive Care and Critical Care Medicine) या विषयाचे विशेष प्रशिक्षण घेत त्यांनी क्रिटिकल केअर मेडिसिन क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले.

कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात सर्वत्र भीतीचे वातावरण असताना डॉ. फिस्के यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य दिले. गंभीर रुग्णांवरील उपचार, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि अतिदक्षता उपचारांच्या माध्यमातून त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय भूमिकेची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे त्यांना ‘आरोग्यदूत’ म्हणूनही सन्मानित करण्यात आले आहे.

सध्या मेहकर येथील शिवाजीनगरमधील गोविंद क्रिटिकल केअर अँड हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर म्हणून कार्यरत असलेले डॉ. फिस्के ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय उपचार, आपत्कालीन सेवा आणि अतिदक्षता उपचार स्थानिक पातळीवरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे गंभीर आजारांच्या उपचारांसाठी ग्रामीण रुग्णांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज कमी करण्याच्या दृष्टीने त्यांच्या कार्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

वैद्यकीय ज्ञानाला मानवतेची जोड देत ‘रुग्णसेवा हीच मानवसेवा आणि समाजसेवा हीच खरी साधना’ या भावनेतून कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र फिस्के यांच्या ज्ञान, कर्तृत्व, सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि संकटकाळातील उल्लेखनीय आरोग्यसेवेचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वेदान्ताचार्य सद्गुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते डॉ. फिस्के यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातून वैद्यकीय क्षेत्रात पुढे येत समाजातील गरजू रुग्णांना आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. फिस्के यांच्या कार्याचा पलसिद्ध मठ संस्थानकडून करण्यात आलेला हा गौरव ग्रामीण आरोग्यसेवेच्या क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top