New Leadership : अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चांना वेग आला असून, जिल्हा नेतृत्व पुन्हा एकदा कुणबी समाजाकडे देण्याची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. पक्ष संघटन बळकट करणे, सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समतोल साधणे, या दृष्टीने ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे.ही मागणी पक्षाने मान्य केल्यास पातूर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेश केशवराव गावंडे यांचे नाव संभाव्य जिल्हा नेतृत्वासाठी सध्या चर्चेत आहे.

राजेश गावंडे यांचे नाव आघाडीवर ; आगामी निवडणुकांमुळे संघटनेवर पक्षाचा भर
जाकीर अहमद
अकोला : अकोला जिल्हा काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चांना वेग आला असून, जिल्हा नेतृत्व पुन्हा एकदा कुणबी समाजाकडे देण्याची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. पक्ष संघटन बळकट करणे, सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक समतोल साधणे, या दृष्टीने ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे.ही मागणी पक्षाने मान्य केल्यास पातूर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेश केशवराव गावंडे यांचे नाव संभाव्य जिल्हा नेतृत्वासाठी सध्या चर्चेत आहे.
काही कार्यकर्त्यांच्या मते, पूर्वी काँग्रेसमध्ये कुणबी समाजाला प्रतिनिधित्व मिळाले असताना पक्षाला जिल्ह्यात राजकीय बळ मिळाले होते. त्यामुळे सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत पुन्हा या समाजातील नेतृत्वाला संधी दिल्यास काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण आणि नव्या कार्यकर्त्यांची ऊर्जा निर्माण होऊ शकते, अशी भावना संघटन पातळीवर व्यक्त होत आहे.
अलीकडील लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष Nana Patole यांच्या नेतृत्वाखाली अकोला जिल्ह्यात विविध समाजघटकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर नव्या नेतृत्वाला संधी देण्याची मागणी अधिक जोर धरत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पातूर तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजेश केशवराव गावंडे यांचे नाव संभाव्य जिल्हा नेतृत्वासाठी कार्यकर्त्यांत चर्चेत आले आहे. बाभुळगाव (ता. पातूर, जि. अकोला) येथील रहिवासी असलेले गावंडे हे तरुण, तडफदार आणि तळागाळाशी घट्ट नाळ जोडलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. काँग्रेस सेवा दलाचे तालुका अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले असून, कार्यकर्त्यांशी त्यांचा सशक्त संपर्क हा त्यांचा मोठा राजकीय प्लस पॉइंट मानला जात आहे.
वरिष्ठ नेत्यांशी समन्वय साधण्याची क्षमता, सर्व समाजघटकांशी संवादाची शैली आणि नम्र स्वभाव या गुणांमुळे गावंडे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसची धुरा त्यांच्या हाती दिल्यास संघटनाला नवी ऊर्जा, तरुण चेहरा आणि सामाजिक समतोलाचा संदेश मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
काँग्रेसचे कार्यकर्ते वासुदेवराव खुमकर यांनीही प्रतिक्रिया देताना, “ज्यांना कोणताही वैयक्तिक फायदा होत नाही आणि जे पक्षाच्या भवितव्याची चिंता करतात, तेच माझ्यासोबत चालतात,” असे मत व्यक्त केले. या विधानामुळे जिल्ह्यातील काँग्रेसमधील नेतृत्व बदलाच्या चर्चांना आणखी धार मिळाली आहे.

