Momentum gathers: प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रति थेंब अधिक पीक’ अभियानांतर्गत बाळापूर तालुक्यात अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत सूक्ष्म सिंचन विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे ठिबक व तुषार (स्प्रिंकलर) सिंचन प्रणालीचा लाभ अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.

महाडीबीटीवर अर्ज करा आणि घ्या सूक्ष्म सिंचनाचा लाभ; कृषी विभागाचे आवाहन
बाळापूर : प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘प्रति थेंब अधिक पीक’ अभियानांतर्गत बाळापूर तालुक्यात अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 1 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत सूक्ष्म सिंचन विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे ठिबक व तुषार (स्प्रिंकलर) सिंचन प्रणालीचा लाभ अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे.

तालुका कृषी अधिकारी सागर डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर तात्काळ अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एकूण 90 टक्क्यांपर्यंत पूरक अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे आधुनिक सूक्ष्म सिंचन प्रणाली स्वीकारणे शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ होणार आहे.

कृषी विभागाच्या मते, ठिबक आणि तुषार सिंचन प्रणालीमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होतो. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत या पद्धतीत पाण्याची बचत, उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि पीक व्यवस्थापनात सुलभता मिळते. विशेषतः पाण्याची टंचाई असलेल्या भागांमध्ये सूक्ष्म सिंचन प्रणाली ही अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होऊन त्यांच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते, असे सागर डोंगरे यांनी नमूद केले.
तालुक्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मंडळ कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून अर्ज प्रक्रियेबाबत माहिती घ्यावी. तसेच महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज नोंदवून शासनाच्या या विशेष मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही तालुका कृषी अधिकारी सागर डोंगरे यांनी केले आहे.
कृषी क्षेत्रात शाश्वतता आणि पाण्याचा सुयोग्य वापर वाढविण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, बाळापूर तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

