MLA Manoj Kayande : सिंदखेडराजा मतदारसंघातील साखरखेर्डा परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. आमदार मनोज कायंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर साखरखेर्डा येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, शासनाने यासंदर्भात सूचना व हरकती मागविल्या आहेत. या घडामोडीमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून साखरखेर्डा तालुका निर्मितीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

समृद्धी नवनगरासह विकासकामांना वेग; शासनाने काढले नोटिफिकेशन : आमदार मनोज कायंदे
गजानन तिडके
देऊळगाव राजा : सिंदखेडराजा मतदारसंघातील साखरखेर्डा परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे. आमदार मनोज कायंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर साखरखेर्डा येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, शासनाने यासंदर्भात सूचना व हरकती मागविल्या आहेत. या घडामोडीमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून साखरखेर्डा तालुका निर्मितीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.तसेच सावरगाव परिसरातील प्रस्तावित ‘समृद्धी नवनगर’ प्रकल्पाविषयी शासनाने अधिकृत अधिसूचना (नोटिफिकेशन) जारी केले आहे. त्यामुळे, लवकरच हा प्रकल्पही मार्गी लागणार आहे असे आमदार मनोज कायंदे यांनी सांगितले.
महसूल व वन विभागाने २३ जून २०२६ रोजी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करण्यासाठी नवीन कार्यालयांची मुख्यालये व कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत साखरखेर्डा येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
प्रस्तावानुसार साखरखेर्डा हे या कार्यालयाचे मुख्यालय राहणार असून साखरखेर्डा आणि शेंदुर्जन या दोन महसूल मंडळांचा त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. तर सिंदखेडराजा, सोनोशी, किनगाव राजा, दुसरबीड आणि मलकापूर पांग्रा ही मंडळे मूळ तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राहतील.
यासंदर्भातील सार्वजनिक सूचना उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय तसेच संबंधित महसूल विभागाच्या कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिक, सामाजिक संस्था किंवा संबंधित घटकांना या प्रस्तावाबाबत सूचना, हरकती अथवा आक्षेप असल्यास ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना आमदार मनोज कायंदे म्हणाले की, साखरखेर्डा परिसराच्या प्रशासकीय विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेली मागणी आता प्रत्यक्षात येत असून भविष्यात साखरखेर्डा तालुका निर्मितीचा मार्गही अधिक सुकर होईल.
दरम्यान, सावरगाव परिसरातील प्रस्तावित ‘समृद्धी नवनगर’ प्रकल्पाबाबतही शासनाकडून अधिकृत अधिसूचना (नोटिफिकेशन) प्रसिध्द झाले आहे. या प्रकल्पासमोरील अनेक प्रशासकीय अडचणी दूर करण्यात यश आले आहे, असेही कायंदे यांनी सांगितले.
मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, प्रशासकीय सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी भविष्यातही सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही आमदार कायंदे यांनी दिली. त्यामुळे आगामी काळात साखरखेर्डा आणि परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

“आपल्या सर्वांच्या सहकार्याने अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या साखरखेर्डा तालुका निर्मितीच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडत आहे. यापूर्वी मंजूर झालेल्या साखरखेर्डा अपर तहसीलदार कार्यालयाच्या निर्मिती व कार्यक्षेत्र निश्चिती संदर्भात शासनातर्फे सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.याचप्रमाणे, सावरगाव परिसरातील प्रस्तावित ‘समृद्धी नवनगर’ निर्मिती संदर्भातील अनेक वर्षांपासूनच्या प्रशासकीय अडचणी दूर करण्यात आम्हाला यश आले असून, त्या प्रकल्पाबाबतही शासनाने अधिसूचना (नोटिफिकेशन) जारी केले आहे.आपल्या ऐतिहासिक मतदारसंघाच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित असलेल्या विविध समस्या व विकासकामे सर्वांच्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही कायम राहील.”
— मनोज कायंदे
आमदार, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ

