Mahabreaking

[breaking_news]

Sugar Factory :पेनगंगा साखर कारखान्यात मिल रोलर पूजन उत्साहात; ३ लाख ११ हजार मे. टन गाळपाचे उद्दिष्ट

Sugar Factory : पेनगंगा साखर कारखाना प्रा. लि. येथे गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा शुभारंभ आणि मिल रोलर पूजन सोहळा बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक आदरणीय राधेश्यामजी चांडक (भाईजी) यांच्या शुभहस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले.

Sugar Factory

 नव्या गाळप हंगामासाठी पेनगंगा सज्ज; मिल रोलर पूजनाने पूर्वतयारीचा शुभारंभ

पंडित सावळे

मासरूळ: पेनगंगा साखर कारखाना प्रा. लि. येथे गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा शुभारंभ आणि मिल रोलर पूजन सोहळा बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. बुलढाणा अर्बन परिवाराचे संस्थापक आदरणीय राधेश्यामजी चांडक (भाईजी) यांच्या शुभहस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना राधेश्यामजी चांडक (भाईजी) म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी तसेच शेतकरी आणि कामगार वर्गाच्या हितासाठी कार्यरत असलेल्या पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी बुलढाणा अर्बन भक्कमपणे उभी आहे. सन २०२१ पासून सुरू झालेल्या या कारखान्याचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून, बुलढाणा अर्बनने दिलेले पाठबळ सार्थकी लागत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.

कारखान्याची सातत्यपूर्ण प्रगती ही समाधानाची बाब असून, आगामी काळातही बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. कारखान्याचा वाढता विस्तार आणि प्रगती पाहता चेअरमन अनिल गुंजाळ यांना आता बुलढाणा जिल्ह्याचे रहिवासी होऊन पेनगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भरीव योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन अनिल गुंजाळ यांनी राधेश्यामजी चांडक (भाईजी) यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी पाहिलेले औद्योगिक प्रगतीचे स्वप्न, शेतकरी हित आणि तरुणांसाठी रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पेनगंगा साखर कारखान्याच्या माध्यमातून अविरत प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त केला.

शेतकरी हा कारखान्याच्या केंद्रस्थानी असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन कारखान्याची वाटचाल केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच तरुणांसाठी रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

गाळप हंगामासाठी कारखाना सज्ज

आगामी गाळप हंगामासाठी यंत्रसामग्री, मिल, बॉयलर आणि उत्पादन विभागाची आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली असून, शेतकी विभागामार्फत ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्थेचे नियोजनही अंतिम टप्प्यात असल्याचे अनिल गुंजाळ यांनी सांगितले. सुरळीत आणि कार्यक्षम गाळप हंगामासाठी कारखाना सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पेनगंगा साखर कारखान्याने आगामी गाळप हंगामात ३ लाख ११ हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यासाठी ऊस उपलब्धता, तोडणी-वाहतूक व्यवस्था आणि कारखान्याची तांत्रिक क्षमता यांचे योग्य नियोजन करण्यात आले आहे.

कारखान्याच्या माध्यमातून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यासोबतच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होत असून, बुलढाणा जिल्ह्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासालाही चालना मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कारखान्याच्या प्रगतीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी आणि कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, सर्वांच्या सहकार्याने आगामी गाळप हंगाम यशस्वी करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

प्रेरणादायी व्याख्यानाने कर्मचाऱ्यांना नवी ऊर्जा

कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते जयवंत आवटे यांचे ‘जाऊ आनंदाच्या गावा’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान झाले. दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळताना प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे करावे, कामावर प्रेम करावे आणि संस्थेप्रती निष्ठा ठेवावी, असा संदेश त्यांनी दिला.

आपण ज्या संस्थेत काम करतो, त्या संस्थेमुळे समाजात आपल्याला वेगळी ओळख आणि सन्मान मिळतो, हे प्रत्येकाने कायम लक्षात ठेवावे, असे सांगून त्यांनी काम ही केवळ जबाबदारी नसून त्यातून समाधान, आनंद आणि आत्मसन्मान मिळविण्याचा मार्ग असल्याचे स्पष्ट केले. आपल्या कामाचा अभिमान बाळगत सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कडूभाऊ काळे, संस्थापक नागेबाबा परिवार; कमलेश शेठ संचेती, के. एस. ट्रेडिंग; आजिनाथ हजारे, संस्थापक ज्योती क्रांती परिवार; शेषरावभाऊ जायभये, विश्वस्त; राजुरेश्वर गणपती संस्थान, राजूरचे प्रतिनिधी; डॉ. शिवकुमार गोरे, संस्थापक अनुपम फार्मसी व द वास्तुसुख; अभिनाथ शिंदे सर, संस्थापक व्यंकटेश ग्रुप; व्यंकटजी देशमुख, सहसंचालक व्यंकटेश ग्रुप; प्रजापती सर, सी.ए., पुणे तसेच सौ. पूजा गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top