Dafde-Bajav Protest : शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धकृती पुतळ्याच्या प्रश्नावरून मातंग समाज आणि नगरपरिषद प्रशासन यांच्यातील संघर्ष तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देत समाज बांधवांनी आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा दिला आहे. गत ४१ दिवसांपासून उपोषण सुरू आहे.

४१ दिवसांच्या उपोषणानंतर आंदोलन तीव्र; लोककलेतून लढा उभारण्याचा निर्धार
खामगाव : शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धकृती पुतळ्याच्या प्रश्नावरून मातंग समाज आणि नगरपरिषद प्रशासन यांच्यातील संघर्ष तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे. मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देत समाज बांधवांनी आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा दिला आहे. गत ४१ दिवसांपासून उपोषण सुरू आहे.
खामगाव शहरातील रेल्वे गेटसमोर दि. २५ मार्च रोजी अण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात आला होता. मात्र, या पुतळ्याच्या उभारणीबाबत प्रशासनाने नियमबाह्य असल्याचे सांगत आक्षेप घेतला. यानंतर पुतळा नियमित करावा तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी मातंग समाज बांधवांनी दि. २६ मार्चपासून नगर परिषदेसमोर साखळी उपोषण सुरू केले.
या उपोषणाला तब्बल ४१ दिवस उलटूनही नगरपरिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली गेली नसल्याने समाजात नाराजी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर दि. ४ मे रोजी नगर परिषदेसमोर डफडेबाजाव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आंदोलनकर्त्यांच्या मते, अण्णाभाऊ साठे हे वंचित समाजाचे प्रेरणास्थान असून त्यांच्या पुतळ्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, प्रशासनाकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याची भूमिका समाजाने घेतली आहे.
राजकीय वर्तुळात या प्रकरणाकडे संवेदनशील सामाजिक मुद्दा म्हणून पाहिले जात असून, स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आगामी काळात मातंग समाज विविध लोककलेच्या माध्यमातून आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्याची चेतावणी देण्यात आल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि तोडगा कसा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

