Masrul Sarpanch : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ ग्रामपंचायतीच्या सरपंच शकुंतलाबाई महाले यांना ग्रामविकास, स्वच्छता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान-२०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

ग्रामविकासातील उल्लेखनीय कार्याची दखल; शकुंतलाबाई महाले यांचा राज्यस्तरीय गौरव
पंडीत सावळे
मासरूळ : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ ग्रामपंचायतीच्या सरपंच शकुंतलाबाई महाले यांना ग्रामविकास, स्वच्छता आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय ‘सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान-२०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुण्यातील पत्रकार भवन, नवी पेठ येथे शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या भव्य सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. समाजात सकारात्मक आणि क्रांतिकारी बदल घडविण्यासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी या राज्यस्तरीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
सरपंच शकुंतलाबाई महाले यांच्या नेतृत्वाखाली मासरूळ गावात अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. यामध्ये गावातील स्वच्छता व्यवस्थेसाठी घनकचरा संकलनासाठी ट्रॅक्टरची उपलब्धता, सिमेंट रस्ते व नाल्यांचे बांधकाम, चक्रधर स्वामी कमान, चक्रधर स्वामी मंदिरासाठी सभागृह, ग्रामपंचायत भवन, पाधान रस्ता, अल्हाटवाडी डांबरी रस्ता, शनिश्वरवाडी सिमेंट रस्ता, गावातील बारी परिसरातील विकासकामे, समाजासाठी भव्य मंगल कार्यालय, माळी समाजासाठी सभागृह, जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी व नळ योजना तसेच वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम यांचा समावेश आहे. या विकासकामांची दखल घेत त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला ARJ एशिया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे चेअरमन जितेंद्र तुळशीराम दाते तसेच ‘देऊळ बंद’ चित्रपटातील अभिनेत्री आर्या घारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सामाजिक, राजकीय, सेवा, आरोग्य, कला, शिक्षण, उद्योग तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी प्रत्येक सन्मानार्थीला सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पदक प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुणे जितेंद्र तुळशीराम दाते यांनी आपल्या मनोगतात समाजातील गुणी व्यक्तींना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तर अभिनेत्री आर्या घारे यांनी पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचे योगदान नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
या सन्मान सोहळ्याला मासरूळचे माजी सरपंच शेषराव सावळे, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप शिनकर, सरपंचपुत्र मधुकर महाले, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर देशमुख, कृष्णा सिनकर तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळूभाऊ सपकाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सरपंच शकुंतलाबाई महाले यांच्या या राज्यस्तरीय गौरवाबद्दल मासरूळ ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

