Married Woman Harassed :माहेरून व्यवसायासाठी ५ लाख रुपये आणण्याची मागणी करत तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत विठ्ठलवाडी येथील २१ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोणगाव : माहेरून व्यवसायासाठी ५ लाख रुपये आणण्याची मागणी करत तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत विठ्ठलवाडी येथील २१ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे.या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. आरती प्रेमनाथ इंगळे (वय २१) हिचा विवाह आरोपी प्रेमनाथ रवींद्र इंगळे (रा. विठ्ठलवाडी, ता. मेहकर) याच्यासोबत सामाजिक रीतीरिवाजाप्रमाणे झाला होता. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत सुरू होता. आरोपी पती अकोला येथील एका कंपनीत काम करत होता, तर फिर्यादी आरती ही अकोला येथील गोयंका लॉ कॉलेजमध्ये बी.ए. एलएल.बी.चे शिक्षण घेत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, काही काळानंतर आरोपी पतीचे काम सुरळीत न चालल्याने तो मद्याच्या आहारी गेल्याचा आरोप आहे. त्यानंतर पती-पत्नीमध्ये आर्थिक कारणांवरून वाद होऊ लागले. आरोपीने फिर्यादीकडे तिच्या आई-वडिलांकडून व्यवसायासाठी ५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावत, पैसे न आणल्यास घरात राहू नको, असे सांगून तिचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पैसे न दिल्यास तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
सततच्या कथित शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून फिर्यादी माहेरी परतल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर फिर्यादीचे वडील व भाऊ यांनी आरोपीची समजूत काढून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर फिर्यादीने डोणगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर आरोपी प्रेमनाथ रवींद्र इंगळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल ईश्वर सोनुने करीत आहेत.

