Man murdered : येथे का आलास यावरून वाद घालत एकाने लाकडी टेंपे मारून एकाची हत्या केल्याची घटना मोताळा तालुक्यातील चिचपूर येथे गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शेख नईम शेख सलीम (वय अंदाजे ४२, रा. वॉर्ड क्र. १२, मोताळा) असे मृतकाचे नाव आहे तर निलेश सिताराम मापारी (रा. चिचपूर, ता. मोताळा)असे आरोपीचे नाव आहे.

‘येथे का आलास?’ या कारणावरून वाद; शेतातून परत येत असताना केला हल्ला
मोताळा : येथे का आलास यावरून वाद घालत एकाने लाकडी टेंपे मारून एकाची हत्या केल्याची घटना मोताळा तालुक्यातील चिचपूर येथे गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शेख नईम शेख सलीम (वय अंदाजे ४२, रा. वॉर्ड क्र. १२, मोताळा) असे मृतकाचे नाव आहे तर निलेश सिताराम मापारी (रा. चिचपूर, ता. मोताळा)असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक शेख नईम शेख सलीम हे गुरुवारी सकाळी चिचपूर येथील शेतात जाऊन आपल्या मोटारसायकलने घरी परत येत होते. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास चिचपूर गावातील पांडुरंग गंगाराम मापारी यांच्या घराजवळील रस्त्यावर ही घटना घडली.
फिर्यादी शेख मोबीन शेख सलीम (वय ३६, रा. मोताळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी निलेश सिताराम मापारी (रा. चिचपूर, ता. मोताळा) याने “येथे येण्याचे कारण काय?” या कारणावरून वाद घालत शेख नईम यांच्यावर लाकडी टेंप्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी निलेश मापारी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा हेड कॉन्स्टेबल राजेश हिवाळे यांनी नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
घटनेमुळे चिचपूर व मोताळा परिसरात खळबळ उडाली असून, सकाळच्या वेळी भररस्त्यात घडलेल्या या हत्याकांडाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

