Sandeep Sapkal : श्री संत बाळूमामा मेंढपाळ संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मासरूळ येथील संदीप रामधन सपकाळ यांची बुलढाणा जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे मेंढपाळ समाजाच्या संघटनात्मक कार्याला जिल्ह्यात नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मेंढपाळ समाजाच्या संघटनात्मक लढ्याला नवे नेतृत्व; संदीप सपकाळ यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
पंडित सावळे
मासरूळ : श्री संत बाळूमामा मेंढपाळ संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मासरूळ येथील संदीप रामधन सपकाळ यांची बुलढाणा जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे मेंढपाळ समाजाच्या संघटनात्मक कार्याला जिल्ह्यात नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मेंढपाळ समाजाचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास साधण्यासोबतच समाजबांधवांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य करण्याची जबाबदारी संदीप सपकाळ यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील मेंढपाळ बांधवांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांसह दुष्काळी परिस्थितीत निर्माण होणारा पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्न, मेंढ्यांचे संरक्षण, शासकीय योजनांचा लाभ तसेच समाजबांधवांवर होणारे अन्याय व अत्याचार या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
समाजाची एकजूट हेच संघटनेचे खरे बळ असल्याच्या भावनेतून बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेचे जाळे मजबूत करून जास्तीत जास्त मेंढपाळ बांधवांना संघटनेशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. मेंढपाळ समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघटित लढा उभारण्यासोबतच समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल संदीप सपकाळ यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आणि विश्वास व्यक्त करणाऱ्या समाजबांधवांना दिले आहे.
“पद हे सन्मानाचे नसून समाजसेवेचे दायित्व आहे. समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होऊन मेंढपाळ बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हेच माझे प्रथम कर्तव्य असेल,” अशी भावना नवनियुक्त जिल्हाप्रमुख संदीप सपकाळ यांनी व्यक्त केली.

