Loan waiver scheme: महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील १० हजार ४६७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या निर्देशानुसार योजनेची अंमलबजावणी गतीने आणि प्रभावीपणे सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ग्रामपंचायत ते बँक शाखांपर्यंत याद्या उपलब्ध; आधार-बँक लिंक व प्रमाणीकरणाशिवाय लाभ मिळणार नाही
गजानन तिडके
बुलढाणा : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील १० हजार ४६७ पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या निर्देशानुसार योजनेची अंमलबजावणी गतीने आणि प्रभावीपणे सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
जिल्हास्तरीय कर्जमुक्ती समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना विलंब न करता आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. आधार प्रमाणीकरणाशिवाय योजनेचा लाभ मिळणार नसल्याने ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, ग्रामसेवा सहकारी संस्था, तलाठी कार्यालय, सहकारी बँकांच्या शाखा तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी याद्यांमध्ये आपले नाव तपासून फार्म आयडी आणि आधार कार्ड घेऊन जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक आणि बँक खाते अद्याप परस्पर जोडलेले (लिंक) नाहीत, त्यांनी संबंधित बँक अथवा संस्थेशी संपर्क साधून ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरण आणि बँक खाते लिंकिंग पूर्ण झाल्यानंतरच पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास संबंधित तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज करून दाद मागता येणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ वितरित करण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे आणि शासनाच्या महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

