‘Mahapuja :आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीसंत नरहरिनाथ महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रशासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. गेल्या चार वर्षांपासून आषाढी एकादशीच्या दिवशी तहसीलदारांच्या हस्ते ही महापूजा आयोजित करण्याची परंपरा संस्थानात कायम राखण्यात आली आहे.

श्रीसंत नरहरिनाथ संस्थानात भक्तिभावाचे वातावरण; तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या हस्ते महापूजा
गजानन तिडके
देऊळगाव राजा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीसंत नरहरिनाथ महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची प्रशासकीय महापूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. गेल्या चार वर्षांपासून आषाढी एकादशीच्या दिवशी तहसीलदारांच्या हस्ते ही महापूजा आयोजित करण्याची परंपरा संस्थानात कायम राखण्यात आली आहे.
याच वेळी आगामी ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महर्षी वसिष्ठ वेद विद्यालय व श्रीसंत तुकाराम महाराज वारकरी विद्यालयाच्या प्रथम पदवीदान समारंभ, श्रीसंत नरहरिनाथ महाराज त्रिशताब्दी जयंती महोत्सव तसेच श्रीसंत नरहरिनाथ महाराज जीवनगौरव पुरस्कार समारंभासाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत ‘नाथपीठ ३००’ या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, संस्थानचे मठाधिपती मोहन महाराज पैठणकर आणि ह.भ.प. उद्बोध महाराज पैठणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
‘नाथपीठ ३००’ हे या बोधचिन्हाचे ब्रीदवाक्य असून, त्यामध्ये संस्थानाची तीनशे वर्षांची आध्यात्मिक परंपरा, भगवान पांडुरंगाचे प्रतीक आणि ज्ञानदान व सेवाकार्य या मूल्यांचा समावेश करण्यात आला आहे. संस्थानाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचा समन्वय या बोधचिन्हातून प्रभावीपणे मांडण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास श्रीसंत नरहरिनाथ महाराज सेवा समितीचे पदाधिकारी, सदस्य, वारकरी, भाविक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे संस्थान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

