RTO : रस्ते अपघातानंतरच्या ‘सुवर्ण तासात’ (Golden Hour) जखमींना तातडीची मदत करून अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या शोध-बचाव पथकातील ३३ धाडसी राहवीरांचा अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने सन्मान करण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. रविंद्र भुयार तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. मोहम्मद समीर मोहम्मद याकूब यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.

अकोला : रस्ते अपघातानंतरच्या ‘सुवर्ण तासात’ (Golden Hour) जखमींना तातडीची मदत करून अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या शोध-बचाव पथकातील ३३ धाडसी राहवीरांचा अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने सन्मान करण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद समीर मोहम्मद याकूब यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला.
या वेळी मा. चंडिका शोध-बचाव आपत्कालीन पथक आणि वीर भगतसिंग शोध-बचाव आपत्कालीन पथक या संस्थांमधील एकूण ३३ राहवीरांचा सत्कार करण्यात आला. अपघाताच्या ठिकाणी तात्काळ पोहोचून जखमींना सुरक्षितरित्या रुग्णालयात दाखल करणे, प्राथमिक उपचार देणे व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही पथके सातत्याने करीत आहेत.
समाजाचे खरे ‘जीवनदाते’ – आरटीओ अधिकारी
रस्ते अपघातानंतर पहिल्या काही मिनिटांत मिळणारी मदत ही प्राणवाचक ठरते. अशा कठीण प्रसंगी कोणतीही अपेक्षा न ठेवता मदतीसाठी धावून येणारे नागरिक हे समाजाचे खरे ‘जीवनदाते’ असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
गुड समरिटन योजनेची माहिती, नागरिकांना आवाहन
कार्यक्रमादरम्यान नागरिकांना रस्ता सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या नागरिकांना शासनाच्या ‘गुड समरिटन (Good Samaritan)’ योजनेअंतर्गत पूर्ण कायदेशीर संरक्षण असल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत करताना नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असेही स्पष्ट करण्यात आले.
मानवतावादी दृष्टिकोन वाढीस लागणार
अकोला आरटीओच्या या उपक्रमामुळे समाजात मानवतावादी दृष्टिकोन बळकट होईल तसेच भविष्यात अधिकाधिक नागरिक अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या सन्मान सोहळ्यास आरटीओ विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शोध-बचाव पथकांचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

